MaharashtraNewsUpdate : राज्यपाल -मुख्यमंत्र्यांच्या “लेटर बॉम्ब वरून” ” या ” नेत्यांनी दिल्या तीव्र प्रतिक्रिया

राज्यातील मंदिरे सुरु करण्यावरून , हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रावरून शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमक सुरू असतानाच यावर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत . वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नाही. शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायम आहे. फक्त महाराष्ट्रात या दोन्ही पक्षांमध्ये सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई सुरू आहे, असे यावर प्रकाश आंबेडकर म्हटले आहे. भाजपने सुरू केलेलं मंदिर आंदोलन आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेली शाब्दिक चकमक या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी हि प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्य सरकारने अद्यापही मंदिरं सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार मंदिरं उघडी न करून इतर पक्षांना आंदोलन करण्याची संधी देत आहे. त्यामुळे मंदिरं सुरू करण्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा अधिकार
राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्रव्यवहारावर आपली तिक्रिया देताना त्यांनी म्हटले आहे कि , राज्यपालांची भूमिका योग्यच आहे. केंद्राच्या निर्णयाचं पालन होतं की नाही, हे पाहण्याचा आणि मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना जे प्रत्युत्तर दिलंय त्याचा आशय केवळ मंदिर उघडण्याबाबतचा आहे, असं सांगतानाच राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या पत्रव्यवहारात अदब पाळला गेला नाही, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच, भाजपने सुरू केलेल्या मंदिर आंदोलनाला आमचा पाठिंबा नाही, असं सांगतानाच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना कायम असून सध्या राज्यात या दोन्ही पक्षात सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई सुरू आहे, असंही ते म्हणाले.
भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रवावर आपली प्रतिक्रिया देताना भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे कि , राज्यपालांकडे जी निवेदन येत असतात, ती निवेदन घेऊन राज्यपाल हे एक पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे पाठवत असतात. त्या पत्रांबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य तो निर्णय घ्यायचा असतो. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे पत्र पाठवले आहे, ते दुर्दैवी आहे. तीन पक्षाचे सरकार आहे. शिवसेना ही स्वत:ला हिंदुत्ववादी पक्ष असल्याचं म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज यांची लढाई लढतो, असल्याचं सांगतो पण त्यांच्या सत्तेच्या काळात मंदिरांवर अन्याय होतो याबद्दल आश्चर्य वाटते’ अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान या वादावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला आहे. राज्यपालांना उत्तर देण्याची ही भाषा नाही. मुख्यमंत्र्यांच्या पत्रात अत्यंत उद्दाम भाषा वापरली आहे. उद्दाम भाषा संजय राऊत वापरतात अशी टीका त्यांनी केली. कोर्टानं ठोकल्यावरच तुम्ही जागेवर येणार का? आजकाल प्रत्येक विषयात तुम्हाला कोर्ट ठोकतंय. राज्यपाल हे एक हिंदू नागरिक आहेत. त्यांना प्रत्येक विषयावर सूचना करण्याचा अधिकार आहे, भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी आम्ही जन्माला आलोय. करायची असेल तर आम्हाला अटक करा असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही मुख्यमंत्र्यांवर टीका केला आहे. ते म्हणाले, यापुर्वी राज्यात मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनी हमरीतुमरीवर येणं असं हे कधीच झाले नव्हतं. राज्यपालांच्या पत्राचा अर्थ समजून घेणं आवश्यक होतं. अहंकारातून सरकार चालवले जात आहे.