AurangabadNewsUpdate : कोरोना बाधित रूग्णाने ठोकली कोविड सेंटरमधून धूम , कोविड सेंटरच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर

औरंंंगाबाद : कोरोनाची लागण झालेल्या एका रूग्णाने कोविड सेंटरमधुन धुम ठोकल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी उघडकीस आला. कोरोनाबाधित रूग्णाने धुम ठोकल्यानंतर कोविड सेंटर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दरम्यान, कोविड सेंटरमधुन कोरोनाबाधित रूग्णाने धुम ठोकल्याने कोविड सेंटरच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
सिल्लोड येथील शरद बाळा चव्हाण (वय ३३, रा. खंडाळा) हा ८ सप्टेंबर रोजी बाहेरगावाहून मध्यवर्ती बसस्थानकात बसने उतरला होता. त्यानंतर त्याची अँटीजेन टेस्ट करण्यात आली होती. त्याचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे रेल्वे स्टेशन रोडवरील अभियांत्रिकी महाविद्यालयातील खोली क्र. जी-३५ मध्ये उपचारासाठी दाखल करण्यता आले होते. शुक्रवारी दुपारी कोविड सेंटरच्या खोलीतून शरद चव्हाण याने धुम ठोकली असल्याचा प्रकार डॉ. मिरतारे अली खान मुजाहिद यांच्या निदर्शनास आला. या घटनेमुळे कोविड सेंटरमधील कर्मचा-यांत एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या दहा ते बारा जणांनी आतापर्यंत शहराच्या विविध भागातील कोविड केअर सेंटरमधुन धुम ठोकली आहे. त्यापैकी काही जणांना पुन्हा एकदा पकडून आणण्यात कोविड केअर सेंटरमधील कर्मचा-यांना यश आले. कोविड सेंटरमधुन रूग्ण पळून जात असल्याने कोविड सेंटरच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.