AurangabadNewsUpdate : जिल्ह्यात विविध ठिकाणी दोघांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू

औरंंंगाबाद : जिल्ह्यातील विविध भागात पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. या दोन्ही घटना सोमवारी (दि.७) घडल्या असून अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेवून दोन्ही ठिकाणचे मृतदेह पाण्याबाहेर काढुन उत्तरीय तपासणीसाठी घाटीत दाखल केले. या दोन्ही घटना खुलताबाद तालुक्यातील तिसगांव तांडा व फुलंब्री तालुक्यात घडल्या असल्याचे अग्निशमन दलाच्या सुत्रांनी कळविले आहे.
विश्वकर्मा हेमंत राठोड (वय १४, रा.तिसगांव तांडा, धामणगांव, ता.खुलताबाद) हा मुलगा पोहण्यासाठी तिसगांव तांडा येथील तलावावर गेला होता. पाण्यात पोहण्यासाठी उतरल्यावर खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला होता. हा प्रकार तलावाजवळील काही नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेवून पाच तासाच्या परिश्रमानंतर विश्वकर्मा राठोड याचा मृतदेह पाण्याबाहेर काढुन उत्तरीय तपासणीसाठी रूग्णालयात दाखल केला. दुसरी घटना, फुलंब्री तालुक्यातील केटीवेअर बंधार्यात घडली. आकाश राजेंद्र तारू (वय १७, रा.फुलंब्री) हा पोहण्यासाठी केटी वेअर बंधार्यात उतरला होता. वाहत्या पाण्यात पोहत असतांना नाका-तोंडात पाणी गेल्याने आकाश तारू हा बुडाला होता. अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेवून दिड तासाच्या परिश्रमानंतर त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.
मुख्य अग्निशमन अधिकारी आर.के.सुरे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी एल.एम.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डयुटी इंचार्ज संजय कुलकर्णी, सचिन शिंदे, शिवसंभा कल्याणकर, संग्राम मोरे, विनोद बमणे, सुभाष दुधे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य केले.