AurangabadNewsUpdate : कोरोनाच्या काळात आर्थिक संकटात असलेल्या वकिलांना मदत करण्याची मागणी

जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणीत असलेल्या वकिलांना शासनाने मदत करावी असे निवेदन ऑल इंडिया लॉयर्स युनियनच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. या निवेदनात लॉयर्स युनियन च्या वतीने म्हटले आहे की जागतिक महामारी covid-19 च्या पार्श्वभूमीवर 22 मार्च पासून टप्प्याटप्प्याने देशभर टाळेबंदी जाहीर केल्यामुळे 20 मे 2020 पर्यंत शासनाच्या अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण देशभर टाळेबंदी लागू होती .
दरम्यान ८ जून 20 20 पासून अत्यंत तातडीची प्रकरणे वगळता इतर न्यायालयीन कामकाज पूर्णतः बंद असल्याने वकिलांचे आणि पक्षकारांचे न्यायालयात येणे, वकिलांना प्रत्यक्ष भेटणे , फीस देणे या सर्व बाबी बंद आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर गुजरात राज्य बार असोसिएशन नोटिफिकेशन काढून 31 डिसेंबर 2020 पर्यंत वकिलांना पर्यायी नोकरी अथवा जॉब करण्याची नोटीस दिली आहे . दरम्यान महाराष्ट्रात आर्थिक अडचणीत सापडलेल्या गरजू वकील बांधवांना इंडियन एडवोकेट मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा, जिल्हा वकील संघ यांच्याकडून अन्न -धान्य किराणा व जीवनावश्यक वस्तूची किट आणि ५०० रुपये रोख असे वाटप एप्रिल -मे महिन्यात करण्यात आले तरी सदरची मदत अतिशय तोकडी आणि मर्यादित स्वरूपाची होती.
टाळेबंदीच्या काळात ज्या वकिलांकडे शेती आहे ते वकील गावी गेले परंतु आर्थिक अडचणीमुळे आणि तत्काळ कर्जाची कुठलीही सुविधा नसल्याने त्यांचीही निराशाच झाली . परिणामी बहुसंख्य वकिलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा वकिलांसाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर ऑल इंडिया लॉयर युनियन महाराष्ट्र राज्याचे सचिव व औरंगाबाद जिल्हा कमिटीचे अध्यक्ष अॅड. बीएम वावळकर, अॅड. जी. एस. गाडीवान, अॅड. एस . के. वाघमारे, अॅड. सचिन गंडले , अॅड. अहमद खान, अॅड. रवींद्र शिरसाट , अॅड. सुनील राठोड, अॅड. भगवान भोजने आदींच्या सह्या आहेत.