Video : AurangabadCrimeUpdate : सावकाराच्या जाचाला कंटाळून माजी सरपंचाची आत्महत्या , मृत्यूपूर्वी प्रसिद्ध केला व्हिडीओ

खुलताबाद: तालुक्यातील चिंचोली आखातवाडाचे माजी सरपंच राधाकृष्ण उर्फ पोपट विठ्ठल बोडखे यांनी खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (२२ जुलै) सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी मच्छिंद्र बोडखे यांच्या फिर्यादीवरून संतोष उत्तमसिंग राजपूत (रा. गल्ले बोरगाव), बाळू नलावडे (रा. बाजारसावंगी) या दोघांविरोधात खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेंव्हापासुन आरोपी फरार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सिताराम मेहेत्रे यांनी दिली. आत्महत्येपूर्वी माजी सरपंच बोडखे यांनी खासगी सावकारी दिलेल्या त्रासाची हकिकत सांगणारी चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.
मिनीनाथ बोडखे यांनी बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घरी येऊन बोडखे यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली. बोडखे कुटुंबीयांनी शेताकडे धाव घेतली. बोडखेंना उपचारासाठी वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माजी सरपंच बोडखे हे शासकीय कंत्राटदार होते. त्यांचे सर्व व्यवहार संतोष उत्तमसिंग राजपूत व बाळू नलावडे हे यांच्यामार्फत चालू होते.
दहा दिवसांपूर्वी राजपूत व नलावडे यांनी बोडखे यांच्या घरी येऊन तुझ्याकडील पैसे देऊन टाक, असे म्हणत शिवीगाळ करून निघून गेले. बोडखे यांनी राजपूत याच्याकडून पाच-सहा वर्षांपूर्वी अडीच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. वेळोवेळी व्याजासह परतफेड करत त्यांनी ४५ लाख रुपये राजपूतला परत केले. तरीही त्याने पैशांचा तगादा लावत होता. त्याचप्रमाणे बाजारसावंगी येथील बाळू नलावडे आणि बोडखे यांनी भागिदारीत खडी क्रेशर मशीन चालविण्यासाठी घेतले होते. नलावडे तिकडे परस्पर खडी विकून पैसे मिळवत होता आणि बोडखे यांच्याकडे जास्त पैसे निघाले म्हणून पैशांचा तगादा करत होता. या त्रासामुळे बोडखेंची मानसिकता प्रचंड खराब झाली होती. नलवडे यांच्याकडे सुरक्षा ठेव म्हणून सही केलेले कोरे ठेवले होते. नलावडेने हे चेक बँकेत टाकले आणि ते बाउन्स झाल्याने तो बोडखेंना ब्लॅकमेल करून पैशांची मागणी करत होता, असा आरोप आहे. तसेच बोडखे यांनी त्यांचा हायवा व जेसीबी नलावडेला दिला होता. ते वर्षभर वापरून त्याने पैसाही कमावला. तसेच वेरूळ येथील सचिन अजमेरा यांनी सात एकर शेतजमीन रजिस्ट्री करून दिली होती. या जमिनीच्या व्यवहारातून मिळालेले पैसे राजपूतला दिले होते. राजपूत व नलावडे यांना खूप वैतागलो असून आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असे सांगत त्यांनी पत्नीला खासगी सावकारांची माहिती दिली होती. राजपूत व नलावडे विरुद्ध गुन्हा दाखल करून पोलसि निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भगवान झरेकर तपास करत आहेत.