#CoronaEffect : मेरे देश मे … : उपासमारीमुळे पाच वर्षीय बालिकेचा मृत्यू , सरकार म्हणाले , आजारी होती , रात्रीतून पोहोचवले घरात धान्य !!

कोरोना या साथीच्या रोगामुळे अनेक बातम्या समोर येत आहेत परंतु सरकारच्या कानावर या गोष्टी जात नसल्याचे चित्र आहे. अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक मजूर आपल्या गावी परतत असून अनेकांच्या हाती काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या संकटात झारखंडमधील लातेहारमधून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार ५ वर्षीय मुलीचा उपासमारीमुळे मृत्यू झाला आहे. ही घटना हेसातु गावातील आहे. जुगलाल भुइया यांच्या ५ वर्षांच्या मुलीचा उपासमारीमुळे मृत्यू झाला आहे. पीडित कुटुंबीयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या ३ दिवसांपासून घरात अन्नाचा कण नाही. काही दिवस शेजारच्यांकडून धान्य मागून मुलांचं पोट भरत होतो. मात्र गेल्या तीन दिवसात घरात धान्य नसल्याने चूल पेटली नाही. त्यामुळे उपासमारीमुळे मुलीचा मृत्यू झाला. दरम्यान ही घटना शनिवारची आहे. या घटनेची सूचना मिळताच जिल्हा प्रशासनाला जाग आली. तातडीने शनिवारी रात्री पीडित कुटुंबाला धान्य पोहोचविण्यात आलं. या प्रकरणार तपास करण्यासाठी रविवारी एसडीएम सागर कुमार पीडित कुटुंबीयाच्या घरी पोहोचले. त्यांनी सांगितले की मुलीचा मृत्यू उपासमारीमुळे नाही तर आजारी पडल्याने झाल्याची शक्यता आहे. पीडित कुटुंबाकडे रेशन कार्ड नसल्याने त्यांना सरकारी मदत मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे. मृत मुलीच्या वडील वीट भट्टीवर काम करीत होते. मात्र लॉकडाऊनमध्ये ते बेरोजगार झाले. यांच्यासारखे अनेक मजुर लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाले आहेत.