हिंदुस्थान लिव्हरवर का बहिष्कार टाका म्हणतात बाबा रामदेव ?

रेड लेबलच्या जाहिरातीवरुन योगगुरु रामदेव बाबा यांनी हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीच्या विरोधात मोहिम उघडली आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने रेड लेबल या चहा पत्तीच्या जाहिरातीमध्ये धर्म आणि संस्कृतीची थट्टा केली आहे, असा आरोप रामदेव बाबा यांनी केला आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरवर बहिष्कार टाकावा, असा मागणी देखील त्यांनी केली आहे.
हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीचं उत्पादन रेड लेबल चहाची जाहिरात नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या जाहिरातीमध्ये मुलगा आपल्या वृद्ध वडिलांना कुंभ मेळ्यात सोडून निघून जातो. जाहिरातीच्या शेवटी ‘कुंभ मेळा ही जगातील सर्वात मोठी धार्मिक सभा आहे, या पवित्र संमेलनात बऱ्याच वृद्धांना त्यांच्या कुटुंबियांनी सोडले आहे,’ असा मजकूर दाखवला आहे. तसेच #ApnoKoApnao असा हॅशटॅग ट्रेंड त्यांनी केला आहे.
यावरुन योगगुरु रामदेव बाबांनी हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीवर निशाणा साधला आहे. त्यांनी #BoycottHindustanUnilever अशी मोहिम देखील त्यांनी ट्विटरवर चालवली आहे. शिवाय विदेशी कंपन्यांवर बहिष्कार टाका, असं देखील ते म्हणाताना दिसत आहेत.
या जाहिरातीत दाखवण्यात आलेल्या दृष्यांना लक्ष्य करत बाबा रामदेव म्हणतात, विदेशी कंपनी नात्यांना उत्पादन मानतात, आपल्यासाठी माता-पिता ईश्वरसमान आहेत. हे देशाला बाजार मानतात, मात्र आपल्यासाठी देश हा परिवार आहे. भारताला आर्थिक, सामाजिक, वैचारिक दृष्ट्या कमकुवत बनवणे हाच या कंपन्यांचा उद्देश आहे, असा आरोप रामदेव बाबा यांनी केला आहे.