#PoliticsOfMaharashtra : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीच्या वादाचा गुंता सुटण्याची चिन्हे ….

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धोक्यात आलेले मंत्रिपद लक्षात घेऊन राज्यपालांनी निवडणूक आयोगाला केलेल्या विनंतीनुसार येत्या दोन दिवसात निवडणुक आयोग राज्यातील या ९ जागांबाबत निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता असल्याचे वृत्त मटा ने दिले आहे. उद्धव ठाकरे यांना २७ मे २०२० पर्यंत विधान परिषदेवर निवडून जाणे आवश्यक आहे. अशावेळी निवडणुक आयोगाने दोन दिवसात कार्यक्रम जाहीर केल्यास त्यानंतर १८ दिवसांच्या आता निवडणुका लागतील आणि सोशल डिटन्सिंग तसेच इतर नियम पाळत या निवडणुका पार पडत २० ते २२ मे च्या आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेवर निवडून जातील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान या प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा वाद उफाळून आलेला असताना , या प्रश्नात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लक्ष घालावे अन्यथा आपण राजीनामा देण्यास तयार आहोत अशी फोनाफोनी उद्धव ठाकरे यांनी केली होती. दरम्यान या प्रकरणात गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सल्ला मसलत झाल्यानंतर विधान परिषदेच्या ९ जागांची निवडणूक घेण्याबाबत निवडणूक आयोगाला विनंती करण्यात आली असून केंद्रातूनच सूत्र हलल्याने येत्या दोन दिवसांत या जागांसाठी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता या वृत्तात वर्तविण्यात आली आहे. या आदेशानुसार कोरोनासंबंधीचे सर्व नियम पाळून २० ते २२ मे पूर्वी या निवडणुका पार पडतील आणि राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीचा अस्थिर खेळ थांबेल, असेही या वृत्तात म्हटले आहे.
राज्यपालांनी का स्वीकारला नाही सरकारचा प्रस्ताव ?
राज्य सरकारने रिक्त झालेल्या राज्यपाल नियुक्त जागेवर उद्धव ठाकरे यांची वर्णी लागावी, यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दोन वेळा शिफारस केली. मात्र एक वर्षापेक्षा कमी कालावधी असल्याचे सांगत ही राज्यपालांकडून हा प्रस्ताव नाकारण्यात येत होता असे सांगण्यात येत आहे. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री उशिरा मोदी, शहा यांच्याशी संपर्क साधल्यानंतर राज्यपालनियुक्त जागेचा विचार सोडून विधान परिषदेच्या ९ जागांच्या निवडणुका हाच मार्ग असल्याने या दिशेने हालचाली सुरू झाल्याचे कळते. या विषयास अनुसरून काल काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या ९ जागांसाठी निवडणुका घेण्याबाबत आयोगाला विनंती करणारे पत्र पाठवले . मुख्य सचिव अजोय मेहता यांनीही याबाबत विनंती केली, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निवडणुका घेण्याबाबतची विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली. शिवसेनेचे गटनेते आणि मंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ही पत्रे राज्यपालांपर्यंत पोहोचवली. त्यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून २४ एप्रिलपासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक घेण्याची विनंती केली आहे. केंद्र सरकारने लॉकडाउनच्या कालावधीत शिथिलता आणली असल्यामुळे मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणुका होऊ शकतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना २७ मे पूर्वी विधानपरिषदेवर निवडून जाणे आवश्यक आहे, याकडे राज्यपालांनी आयोगाचे लक्ष वेधले आहे.