#CoronaVirusEffect : अशी साजरी करा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती : भन्ते करुणानंद थेरो

श्रध्दावान धम्मोपासक/उपासिकांनों,
नमो बुध्दाय, जयभीम…
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, आम्हा-तुम्हा जिवदान देणारे महामानव, बोधिसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यावर्षी कशी साजरी होणार?
हा प्रश्न सध्या अनेकांच्या मनात निर्माण होत आहे.
या संदर्भात विविध ठिकाणांहून समाजबांधव आम्हाला काॅल करून विचारत आहेत.
प्रश्न असा आहे की, जयंती साजरी करावी की नाही?
तर माझे वयक्तीक मत असे आहे की, आपण जयंती साजरी केलीच पाहिजे…
परंतु कशी साजरी करणार?
खरं तर बाबासाहेब स्वत: म्हणाले होते की, ”माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा, मी सांगीतलेल्या गोष्टी जर तुम्ही प्राणपणाने पाळाल तरच तुमचा उध्दार होईल. अन्यथा तुमचा उध्दार करण्यास कोणीही येणार नाही.”
तर मग आपण सर्वजण बाबासाहेबांचे अनुयायी असल्यामुळे बाबांच्या वरील सुविचारांना मनावर घेवून या जयंतीनिमित्त कृतीशील तथा अनुकरणशील अनुयायी बनन्यासाठी काही संकल्प करू शकलो तर निश्चितपणे डाॅ.बाबासाहेबांना अभिप्रेत एक आदर्श समाज आपण निर्माण करू शकतो.
यासाठी मात्र एक तत्व सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे की, याची सुरूवात प्रत्येकाने स्वत: पासून केली पाहिजे. अगोदर स्वत:चे प्रबोधन नंतर इतरांचे.
प्रथम मी आपणास सांगेल की जयंती साजरी करण्यासाठी आपण काय करावे?
१)प्रत्येकाने आपल्या घरासह परिसरातील बुध्द विहारांची साफ सफाई करून सुंदर सजावट करावी. (जसे की, लायटिंग, आकाश दिवे, पताके इत्यादी)
{टिप:- हे सर्व करीत असतांना गर्दी टाळावी.}
२)१३ एप्रिल रोजी रात्री ११:४५ ते १२:०० पर्यंत, आपापल्या घरात सामुहिक त्रिशरण पंचशील, त्रिरत्न वंदना, बुध्द पुजा व भिमस्मरण म्हणून बुध्द बाबासाहेबांच्या प्रतीमांचे पुजन करावे. त्यानंतर रात्री १२:०० वाजता कुटूंबातील एकमेकांना गोड पदार्थ खाऊ घालून शुभेच्छा द्याव्यात. (कोणीही फटाक्यांची आतिषबाजी करू नये.)
३)१४ एप्रिल रोजी सकाळी कुटूंबातील सर्वांनी सामुहिक ध्यान करून सर्व प्राणिमात्रांप्रती मंगलमैत्री करावी.
४)१४ एप्रिल रोजी सकाळी १०:०० वा. बुध्द बाबासाहेबांच्या प्रतीमांचे पुजन करून वर सांगीतल्यानुसार सामुहिक बुध्द वंदना म्हणावी. त्यानंतर २२ प्रतिज्ञांचे पठन व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करावे.
५)आपल्या वाट्याला हे सोन्याचे दिवस यावेत म्हणून बाबासाहेब रात्रंदिवस जागले. त्यामुळे कुटूंबातील सर्वांनी १४ एप्रिल रोजी शुभ्र वस्त्र परिधान करून दिवसभर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथांचे वाचन करून बाबासाहेबांना डोक्यात घ्यावे.
६)१४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते ८ पर्यंत वरीलप्रमाणे बुध्द वंदना करून रात्री ठिक ८:०० वाजता अंगणात १४ मेणबत्त्या किंवा १४ दिवे लावावेत.
७)सकाळच्या वंदनेनंतर कुटूंबातील एका व्यक्तीने परिसरातील बुध्द विहारात वास्तव्य करणाऱ्या भिक्खुंना शक्य होईल ते दान करून यावे.
८)समाजाची बदनामी होईल असे कोणतेही कृत्य १४ एप्रिल निमित्त आपल्याकडून घडणार नाही याची सर्वांनी खबरदारी बाळगावी.
९)जगभरात सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे कोणीही सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नये.
१४ एप्रिल या महान दिनी बाबासाहेबांना अभिप्रेत आदर्श बौध्द समाज निर्माण करण्याहेतू आता आपण काही संकल्प करूया…
१)बाबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे पालन करण्याचा आपण संकल्प करूया.
२)बाबांच्या आदेशानुसार किमान दर रविवारी संपुर्ण कुटूंबासह, आपल्या परिवारास धम्ममय तथा सुसंस्कृत बनविण्यासाठी आपण बुध्द विहारात जाऊया.
३)बाबांच्या आदेशानुसार बुध्द धम्माच्या प्रचारार्थ सदैव आपल्या कमाईचा वीसावा हिस्सा धम्मकार्यास दान देऊया.
४)बाबांच्या आदेशानुसार बौध्दमय भारताच्या निर्मितीकरीता आपल्या कुटूंबातील एक सदस्य धम्मप्रचारार्थ कायमस्वरूपी भिक्खु बनवूया अथवा समर्पित भावनेतून धम्मसेवा करणाऱ्या भिक्खुंना आपल्या कुटूंबातील सदस्यासमान समजून सदैव त्यांची संपुर्ण व्यवस्था करूया.
समाजबांधवांनो, आपण जर वरीलप्रमाणे वागण्याचा सम्यक संकल्प केला, तरच खऱ्या अर्थाने युगपुरुष महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत आहे, असे आपल्याला म्हणता येईल.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा.
सर्वांचे मंगल होवो
-भिक्खु करूणानंद थेरो, 📲9890437445
अध्यक्ष:- विपश्यना एज्युकेशनल ॲण्ड सोशल ट्रस्ट (रजि.)
सदस्य:- अखिल भारतीय भिक्खूसंघ, बुध्दगया (बिहार)
Web:- www.vipassanaest.org