#CoronaVirusUpdate : औरंगाबादच्या देवळाई परिसरात आढळला कोरोनाचा रूग्ण, पोलिसांनी वसाहत केली सील…

औरंंंगाबाद : कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बीड बायपास रोडवरील देवळाई परिसरातील श्रीनिवासनगर येथे राहणा-या एका ४२ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर प्रशासन अधिक सतर्क झाले आहेत . चिकलठाणा पोलिसांनी श्रीनिवासनगर ही वसाहत सील केल्यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी बुधवारी (दि.८) श्रीनिवासनगरला भेट देवून बंदोबस्ताची पाहणी केली.
गेल्या तीन ते चार दिवसाच्या काळात औरंगाबाद शहरात कोरोना बाधीत रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आजघडीला चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात ९, घाटी रूग्णालयात ४ आणि खासगी रूग्णालयात २ कोरोना बाधीत रूग्णावर उपचार करण्यात येत आहेत. कोरोना बाधीत रूग्णांची संख्या वाढल्यामुळे प्रशासनाच्या वतीने खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. ज्या वसाहतीमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत, त्या वसाहती पोलिसांकडून सील करण्यात आल्या असून त्या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, देवळाई परिसरातील श्रीनिवासनगरामध्ये कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आल्यानंतर ही वसाहत चिकलठाणा पोलिसांनी सील केली आहे. बुधवारी ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपअधीक्षक डॉ.विशाल नेहल यांच्यासह चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक महेश आंधळे, गोरख शेळके आदींनी श्रीनिवासनगरची पाहणी केली. यावेळी पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी बंदोबस्तावरील कर्मचाNयांना विविध प्रकारच्या सुचना करून दक्षता घेण्याचे सांगितले.