मोबाईल देण्याच्या बहाण्याने दुसऱ्यांदा बलात्कार करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

बलात्कार पीडितेला तिचा मोबाईल देण्याच्या बहाण्याने एका ठिकाणी बोलवून तिच्यावर पुन्हा बलात्कार केल्या प्रकरणातील आरोपीला जालना येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. संजय हावरे असं या शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.
जालना जिल्हातील आरोपी संजय हावरे याने ९ जुलै २०१५ रोजी एका बलात्कार पीडितेला तिचा मोबाईल परत देण्याच्या बहाण्याने अंबड चौफुली येथे बोलावले होते. त्यावेळी मोबाईल घेण्यास आलेल्या त्या बलात्कार पीडितेला संजय हावरे याने बळजबरीने आपल्या गाडीवर बसवून जंगलात नेऊन तिच्यावर परत बलात्कार केला होता.
याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयाने १० साक्षीदार तपासले. ज्यामध्ये पीडित मुलगी, तिचे आई-वडील,डॉक्टर व इतरांच्या साक्षि महत्वाच्या ठरल्या. न्यायालयाने साक्ष, पुरावे आणि युक्तिवादाच्या आधारे आरोपी संजय हावरे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.