खळबळजनक : मानवत येथील तरुणाचा खून करून पेटवून दिले

मानवत तालुक्यातील ताडबोरगाव शिवारातील पेट्रोल पंपाजवळील गट नंबर २९४ येथे मानवत येथील युवकाचा निर्घुणपणे खून करुन जाळून टाकण्यात आल्याची खळबळजनक घटना गुरुवारी उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानवत येथील तकीया मोहल्ला येथील रहिवासी अख्तर जलील शाह हा ॲपे ऑटो चालक बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून ॲपे ऑटोचे भाडे घेऊन जात असल्याचे सांगून घरातून निघाला होता मात्र रात्री उशीरापर्यत घरी आला नसल्यामुळे घरच्या लोकांनी शोधाशोध सुरू केली मात्र त्याचा पत्ता लागला नाही शेवटी त्याचा भाऊ तन्वीर जलील शाह यांनी मानवत पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद केली होती.
दरम्यान त्याचा शोध घेत असताना अख्तर जलील शाह याचे वाहन क्र.एम एच ३८ पी १०३५ हा पाथरी-परभणी महामार्गावर क्र.६१ बोरगावजवळ आढळून आला व अधिक शोध घेतला असता वाहनापासून एक किलोमीटर अंतरावर ताडबोरगाव शिवारातील पेट्रोल पंपाजवळ गट नंबर २९४ येथील कापसाच्या शेतात बेपत्ता अख्तर जलील शाह या युवकाचा निर्घृणपणे खून करुन त्यास पेटवण्यात आल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी पोलिस कर्मचारी समीर पठाण, जाधव, शेख अलीम, होमगार्ड शेख मझहर यांनी धाव घेतली तसेच मानवत पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी पवार यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी एकबोटे यांनीही घटनास्थळी भेट दिली. श्वानपथक व फॉरेन्सिक पथक ही घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.