निर्भया सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींच्या वेळकाढूपणावर आईची संतप्त प्रतिक्रिया

निर्भया बलात्कार प्रकरणातील एक एक दोषी जाणीवपूर्वक नायायालयात जाऊन न्यायालयाचा वेळ वाया घालवीत असून त्यांचा वेळकाढूपणाचा हा प्रयत्न हणून पाडावा ,फाशीच्या प्रक्रियेच्या अंमलबजावणीस विलंब करण्याचा त्यांचा प्रयत्न पाहता त्यांना आता एकेक करून फासावर लटकवले पाहिजे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया निर्भयाची आई आशादेवी यांनी दिली आहे.
एएनआय या वृत्तवाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘पुन्हा एकवार त्यांच्यापैकी अन्य एकाचा हा वाईट प्रयत्न सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडला. मला तेव्हाच समाधान वाटेल जेव्हा १ फेब्रुवारीला या चौघांना सुळावर चढवले जाईल. ज्या पद्धतीने हे गुन्हेगार एकेक करून वेळ काढत आहेत, ते पाहता त्यांना एकेक करून फाशी द्यायला हवी.’ हे दोषी न्यायालयाचा वेळ वाया घालवत आहेत, असंही त्या म्हणाल्या. तर निर्भयाचे वडील बद्रीनाथ म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाने या दोषींचा हा वेळ काढण्याचा हा प्रयत्न हाणून पाडायला हवा. फाशीला विलंब व्हावा, अशीच त्यांची इच्छा आहे. दोषींनी किती याचिका दाखल करायच्या त्या संख्येवर सर्वोच्च न्यायालयाने मर्यादा आणायला हवी, जेणेकरून महिलांना वेळेत न्याय मिळेल.’
दरम्यान, दोषी पवन कुमार गुप्ता याची अल्पवयीन असल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. पवनने याचिकेत म्हटलं होतं की तो गुन्हा घडला त्यावेळी अल्पवयीन होता. ‘तुम्ही अशा प्रकारे अर्ज करत राहाल तर प्रक्रिया अंतहीन होईल,’ अशी टिप्पणी करत कोर्टाने याचिका फेटाळून लावली.