Uttarpradesh : बलात्कार करून तरुणीला पेटवून दिल्याची घटना , नात्याने काका लागत होता आरोपी

दिवसेंदिवस देशात बलात्काराच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील हुसेनगंज पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील एका गावात एका तरुणीवर बलात्कार करून तिला जाळून ठार मारल्याची संतापजनक घटना घडली असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे या तरुणीच्या काकानेच तिच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिच्यावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळले. ही तरुणी ९० टक्के भाजली असून ती कानपूरमधील एका हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
फतेहपूरचे पोलीस अधीक्षक कपिलदेव मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी १८ वर्षीय असून तिच्यावर शनिवारी दुपारी बलात्कार करण्यात आला. त्यावेळी ही तरुणी एकटीच घरामध्ये होती. तिच्या कुटुंबातील इतर सदस्य शेतात काम करत होते. ही तरुणी घरात एकटीच असल्याचे पाहून २२ वर्षीय तिच्या काकाने घरात प्रवेश केला आणि तिच्यावर अत्याचार केले. आपण हे आता घरातील सर्वांना सांगू असे तरुणीने म्हटल्यानंतर या तरुणाने तिच्यावर रॉकेल आतून तिला जाळले. या तरुणाने पीडितेला आग लावल्यानंतर तिने ओरडाओरडा करायला सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून गावातील लोकांनी धाव घेतली. पहिल्यांदा तातडीने गावातील लोकांनी आग विझवली आणि तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
या घटनेत पीडित तरुणी ९० टकके भाजली असल्याची माहिती मिश्रा यांनी दिली. या तरुणीला तातडीने स्थानिक सार्वजनिक आरोग्य केंद्रावर नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला कानपूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पीडित तरुणीच्या वडिलांनी या तरुणावर बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या तरुणाच्या मागावर आहेत. दरम्यान या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते अशी माहिती मिळत असल्याचेही पोलिसांनी सांगितले असून दोन्ही पक्षांदरम्यान पंचायत भरवून या दोघांचे लग्न लावून द्यावे असा ठराव करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे.