दारूच्या नशेत पत्नीचा खून करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पतीला अटक

आपल्या पत्नीचा दारुच्या नशेत खून करून तिने आत्महत्या केल्याचा बनाव करणाऱ्या पतीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. अयोध्या कहाळे असं या पीडित महिलेचं नाव असून पतीचं नाव विजय कहाळे असं आहे. नातेवाईक आणि पोलिसांना दिलेल्या परस्परविरोधी माहितीमुळे विजय स्वतःच पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारु पिऊन घरी आल्यानंतर, विजय आणि त्याची पत्नी अयोध्या यांच्यात भांडणं झालं. भांडण विकोपाला गेल्यानंतर विजयने आपल्या घरातील टोकदार वस्तुने पत्नी अयोध्याच्या कपाळावर प्रहार केला त्यात गंभीर जखमी होऊन अयोध्या बेशुद्ध होऊन खाली पडल्या, त्यानंतर विजयने दोरीने गळा आवळून पत्नीचा खून केला.
आरोपी विजयने या घटनेनंतर आपल्या नातेवाईकांना खाली पडून गंभीर जखमी झाल्यामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. तर पोलिसांना दिलेल्या जबानीत विजयने आपल्या पत्नीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले . परस्पर विरोधी जबाब दिल्यामुळे पोलिसांनी अखेरीस आपला खाक्या दाखवल्यानंतर विजयने आपला गुन्हा कबूल केला. हिंजवडी पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.