महाराष्ट्र विधानसभा : एक्झिट पोल्समध्ये महायुतीला बहुमत मिळाल्यामुळे भाजपची दिवाळीआधीच मोठ्या आतषबाजीची तयारी…

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आता फक्त काही तास असून उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल. दरम्यान सर्वच एक्झिट पोल्समध्ये महायुतीला मोठे यश मिळणार असल्याचे अंदाज बांधण्यात आल्याने भाजप आणि शिवसेनेच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. या पोल्स मध्ये भाजप-शिवसेना २०० चा आकडा पार करणार असे जवळपास सगळ्याच एक्झिट पोल्सनी सांगितल्यामुळे भाजपने उद्या २४ तारखेच्या जल्लोषासाठी तयारी सुरू केलीय. मिठाई, फटाके आणि ढोल ताशांची सोय करण्यात आलीय. नरिमन पॉईंट इथं असलेल्या भाजपच्या मुख्यालयाबाहेर व्यासपीठही उभारण्यात येणार असून भाजपचे दिग्गज नेते इथे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
भाजपाला अपेक्षित निकाल लागल्यानंतर भाजपने मोठ्या जल्लोषाची तयारी केली असून दिवाळीआधीच फटाक्यांची आतषबाजी करणार आहे.
दरम्यान माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे सलग ११ वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपदावर राहण्याची संधी कुणाही नेत्याला मिळाली नाही. शरद पवार यांनी चार वेळा राज्याचं मुख्यमंत्रीपद भुषवलं मात्र त्यांना एकदाही सलग पाच वर्ष पूर्ण करता आली नाहीत. तो मान आता देवेंद्र फडणवीसांना मिळेल या आशेने भाजपने हि जल्लोषाची तयारी केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या (गुरुवारी)सकाळी ८ वाजता सुरुवात होणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या २० ते २५ मिनिटांत पहिला कल हाती येईल. त्यानंतर कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार आघाडीवर आणि कोणता उमेदवार पिछाडीवर आहे, हे कळण्यास सुरुवात होईल. मतमोजणी सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर दुपारी एकच्या आसपास मतदारसंघाचा निकाल येण्याची शक्यता आहे.
निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्वच पक्षातील उमेदवारांनी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर प्रचारात फारशी रंगात आली नाली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार , मोदी-शहा -फडणवीस यांनी परस्परांवर अनेक आरोप-प्रत्यारोप केल्याने शेवटी निवडणूक काही प्रमाणात थोडीशी रंगतदार झाली होती.आता उद्या मतमोजणीत कुणाचा काय निकाल लागेल याकडे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे .