भाजप पाठोपाठ काँग्रेसचे टी -शर्ट घालून तरुणाची आत्महत्या

भाजपचा टी शर्ट घालून आत्महत्या केल्याची बातमी आल्यानंतर त्या पाठोपाठ आता बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथे एका तरुणाने काँग्रेसचा टी शर्ट अंगात घालून झाडाला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना, आज (गुरूवार) सकाळी ९ वाजता घडली आहे.
सतीश गोविंद मोरे ( वय -२१) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सतीशचे शिक्षण झाले होते, मात्र तो बेरोजगार असल्याने मोलमजूरी करून कुटुंबाचे पालनपोषण करत होता, त्याच्या घरी आई-वडील आणि एक भाऊ असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळाताच धाड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, मृतदेह बुलडाणा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच. याप्रकरणी धाड पोलीस अधिक तपास करत आहेत.
बुलडाणा जिल्हायातील या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. या अगोदर रविवारी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळीच राजू ज्ञानदेव तलवारे (वय-३५) या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. आत्महत्या केलेल्या या शेतकऱ्याच्या अंगावर ‘पुन्हा आणूया आपले सरकार’ असं लिहलेला भाजपचा टी-शर्ट होता. शेगाव तालुक्यातील खातखेड येथे रविवारी सकाळी ११ वाजता हा प्रकार उघडकीस आला होता. कर्जबाजारीपणामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली असल्याचे बोलले जात होते.