सातारा लोकसभा पोटनिवडणूक : अजित पवार कि पृथ्वीराज चव्हाण ? काँग्रेस- राष्ट्रवादीचा निर्णय होईना !!

उदयनराजे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेली सातारा लोकसभा पुन्हा भाजपकडे जाऊ नये म्हणून काँग्रेस- राष्ट्रवादीच्या जोरदार हालचाली चालू आहेत. विधानसभेसोबतच ही निवडणूक होणार असली तरी उदयनराजे यांच्याविरोधात कोण उमेदवार असणार त्याचा निर्णय अजूनही झालेला नाही. हि जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात असल्याने ती पुन्हा राष्ट्रवादीकडे ठेवावी कि काँग्रेसला द्यावी यावर दोन्हीही पक्षांकडून विचार विनिमय केला जात आहे. सदर जागा काँग्रेसला दिल्यास या जागेवर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लढवावी असा आग्रह केला जात आहे तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हि निवडणूक लढवावी असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मत असून त्यादृष्टीने शरद पवार गांभीर्याने विचार करीत आहेत. अजित पवार यांनीही दरम्यानच्या काळात ते ‘ट्रेस आऊट’ होत नसल्याच्या काळात चार दिवस त्यांनी आपला कार्यक्रम घोषित न करता सातारा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या गुप्त बैठकी घेतल्या असल्याच्या चर्चा आहेत.
दरम्यान हि जागा काँग्रेसकडे आल्यास उभे राहता येईल काय याचा विचार विनिमय करण्यासाठी पृथ्वीराज यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा कराडमध्ये आयोजित केला आहे. कारण उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लढण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर कराड दक्षिणमधील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा होत असून चव्हाण यांचे नाव लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेत असतानाच आज कार्यकर्ते नेमकी काय भूमिका हे जाणून घेण्याचा चव्हाण यांचा प्रयत्न आहे . या मेळाव्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनीही मोठी गर्दी केली आहे.
लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांच्याविरोधात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या मोर्चेबांधणीत या जागेवर अजित पवार सरस ठरतील कि काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याची चाचपणी चालू आहे. दरम्यान या जागेवरून शरद पवार यांनी तीन संभाव्य उमेदवारांच्या नावाची घोषणाही केली होती. परंतु अजून या जागेवरून उदयन राजेंच्या विरोधात कोण निवडणूक लढविणार यावरून काँग्रेस राष्ट्रवादीचे एकमत होताना दिसत नाही.
दुसरीकडे तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या उदयनराजेंसाठी यांच्यासाठी यंदाची निवडणूक आव्हानात्मक समजली जात आहे. कारण २०१४ च्या तुलनेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंचं मताधिक्य कमालीचं घटलं आहे. शिवसेनेच्या तिकीटावर लढलेल्या नरेंद्र पाटील यांनी यावेळी उदयनराजेंची चांगलीच दमछाक केली होती त्यामुळे हि जागा टिकविण्यात उदयनराजेंनी यश मिळवले खरे पण मताधिक्यात मोठ्या प्रमाणात झालेली घट ही त्यांच्यासाठी चिंताजनक आहे म्हणूनच त्यांनी स्वतः सुद्धा या विजयानंतरही आपले ‘मताधिक्य कमी होणं हा एकप्रकारे माझा पराभवच आहे’ असं विधान केलं होतं.