विना परवानगी युट्युबवर चित्रपट अपलोड करणाऱ्याविरुद्ध कॉपीराईट ॲक्ट नुसार गुन्हा दाखल

जगदीश कस्तुरे । महानायक न्यूज
चित्रपटाच्या मूळ प्रमाणपत्रांसह डाटा चोरून तो बेकायदेशीररित्या यु ट्यूबवर प्रसारित केल्या प्रकरणी यु ट्यूब प्रशासनासह अपलोड करणाऱ्या एका विरुद्ध कॉपी राईट ॲक्टनुसार मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. समीर मनोज वैती असे अपलोड करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक यु.जी. जाधव यांनी सांगितले की, मच्छींद्र चाटे (५४ रा.एन-२) हे चाटे कोचिंग क्लासेसचे मालक असून चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून २२ वर्षांपासून काम करतात. त्यांची देवयानी मुव्हीज प्रा. लि. नावाची प्रोडक्शन कंपनी आहे. या कंपनीचे कार्यालय कामगार चौकात आहे. या कंपनीचे वैयक्तीक गुगल आणि यु ट्यूब अकाउंट आहे. चित्रपटाच्या प्रमोशच्या वेळी गुगल आणि युट्यूबचा वापर करण्यात येतो. चाटे यांनी ‘मेनका उर्वशी’ हा नवीन चित्रपट जुलै २०१७ ते एप्रिल २०१८ या कालावधीत पूर्ण केला. १५ मार्च २०१९ रोजी मुंबईत प्रदर्शीतही केला. उर्वरित महाराष्टत प्रदर्शीत करणे बाकी आहे. मात्र ५ जून २०१९ रोजी समीर मनोज वैती नावाच्या व्यक्तीने चित्रपटाच्या मूळ प्रमात्रपत्रांसह संपूर्ण चित्रपट चाटे यांची कोणतीही परवानगी न घेता यु ट्यूब या बेवसाईटवर बेकायदेशीररित्या प्रदर्शीत केला. चाटे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी यु ट्यूब प्रशासनाला हा चित्रपट प्रदर्शीत करू नये म्हणून २ ऑगस्ट रोजी यु ट्यूब चॅनलवर फ्लॅग देऊन विनंती केली. तसेच यु ट्यूबच्या प्रशासनाला या गंभीर घटनेबाबत टेक डाऊन नोटिसही दिली.
या व्हीडिओच्या प्रक्रियेत कॉपीराईटचे उलंघन केल्याबद्दल कारवाई करणार असल्याचे नमूद केले होते. परंतु त्यानंतरही या चित्रपटाचा व्हीडिओ आजपर्यंत यु ट्यूबवर उपलब्ध आहेच. यु ट्यूबच्या व्यवस्थापनाला ई मेल करून चित्रपटाच्या मालकीहक्काबाबत, कायदेशीर बाबींची माहिती दिली. परंतु त्यानंतरही व्यवस्थापनाने पुरविलेल्या माहितीचा खोडसाळपणा समजून चाटे यांचेच वैयक्तीक यु ट्यूब अकाउंट बंद केले. त्यामुळे चाटे यांना मोठे नुकसान झाले. चित्रपटाचे मूळ प्रमाणपत्र आणि डेटा चोरून बेकायदेशीररित्या यु ट्यूबवर प्रसारित केल्या प्रकरणी यु ट्यूब प्रशासन आणि समीर मनोज वैती या दोघांविरुद्द मच्छिंद्र चाटे यांनी तक्रार दाखल केली असून कॉपीराईट ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव जाधव करीत आहेत.