पी. चिदंबरम यांना तिहार तुरुंगात ७ नंबर जेलमध्ये स्वतंत्र सेल, दाल , रोटी , टीव्ही , पुस्तकाची सुविधा

आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात रवानगी झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना तुरुंगात ७ नंबर जेलमध्ये स्वतंत्र सेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. चिदंबरम यांना तुरुंगात दाल, रोटी आणि भाजी खायला मिळणार आहे. तुरुंगात त्यांना वेस्टर्न टॉयलेट, टीव्ही, पुस्तकं, चश्मा आणि औषधेही देण्यात येणार आहे. शिवाय त्यांच्यासाठी तुरुंगात पुरेशी सुरक्षा ठेवण्यात येणार आहे.
साधारणपणे तिहारच्या ७ नंबर तुरुंगात पोहोचलेल्या कैद्यांना जमिनीवर झोपायला देतात. परंतु, चिदंबरम यांना लाकडाचा बाकडा झोपण्यासाठी देण्यात येणार आहे. शिवाय त्यांना तीन कांबळही देण्यात येणार आहे, असं तिहार तुरुंगाचे महाअधिक्षक संदीप गोयल यांनी सांगितलं.
दरम्यान, चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी चिदंबरम यांना झेड प्लस सुरक्षा असल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आणून देत त्यांना तुरुंगातही सुरक्षा देण्याची मागणी केली होती. त्यामुळे चिदंबरम यांना तुरुंगात सुरक्षा देण्यात येणार आहे. चिदंबरम यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी २२ ऑगस्ट रोजी ताब्यात घेण्यात आलं होतं. तेव्हापासून ते सीबीआयच्या ताब्यात होते. आज त्यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून १९ सप्टेंबरपर्यंत त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली आहे.