स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्र्वभूमीवर देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी

मुंबई, दिल्लीसह देशातील १५ मोठ्या शहरात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे, असा इशारा गुप्तचर यंत्रणा (आयबी) ने दिल्याने या शहरात जारी करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात दोन मोठे सण आहेत. सोमवारी (१२ ऑगस्ट) बकरी ईद तसेच बुधवारी (१५ ऑगस्ट) आहे.
पुढील आठवड्यात दहशतवादी भारतात हल्ला करण्याची शक्यता असल्याने तपास यंत्रणा तसेच सुरक्षा यंत्रणांनी सतर्क राहावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. १२ ऑगस्ट तसेच १५ ऑगस्ट या दोन दिवशी दहशतवादी भारतात हल्ला करू शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. गुप्तचर यंत्रणाच्या इशाऱ्यानंतर देशातील १५ मोठ्या शहरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. काश्मीर, पूर्वोत्तर भारतातील शहरे हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेत. या ठिकाणी दहशतवादी मोठा हल्ला करण्याची शक्यता आहे.
आयबीच्या इशाऱ्यानंतर पोलीस यंत्रणा, सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्याने काश्मीरमध्ये सध्या अशांतता आहे. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी तसेच तेथील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हे सध्या काश्मीर दौऱ्यावर आहेत.