Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Jammu and Kashmir : हिंसाचाराच्या घटनांमुळे काॅंग्रेस अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया स्थगित : राहुल गांधी

Spread the love

जम्मू-काश्मीरमधून ज्या बातम्या येत आहेत त्या लक्षात घेता तेथील परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. तेथे तणाव वाढला आहे. हिंसाचाराच्याही बातम्या येत आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वस्तूस्थिती देशाला सांगायला हवी, अशी मागणी नेते राहुल गांधी यांनी केली. जम्मू-काश्मीरमधील स्थिती लक्षात घेऊन काँग्रेस अध्यक्षपद निवडीची प्रक्रिया तूर्त स्थगित करण्यात आली आहे, असेही राहुल यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली होती. सकाळी या बैठकीला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी उपस्थित होते. त्यानंतर अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेपासून आम्ही दूर राहणार असल्याचे सांगत सोनिया व राहुल बैठकीतून निघून गेले. त्यानंतर नेत्यांचे क्षेत्रवार ५ गट बनवून त्यात अध्यक्षपदासाठी विविध नावांवर चर्चा झाली. दरम्यान, रात्री ८ वाजता पुन्हा एकदा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली नव्याने कार्यकारिणीची बैठक सुरू झाली. या बैठकीला राहुल व सोनिया उपस्थित राहिले. या बैठकीनंतर नव्या अध्यक्षांची घोषणा होईल, असे बोलले जात होते. मात्र साडेदहाच्या सुमारास बैठकीतून बाहेर येत राहुल माध्यमांना सामोरे गेले व जम्मू-काश्मीरमधील स्थितीकडे बोट दाखवत त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया तूर्त स्थगित ठेवण्यात आल्याचे जाहीर केले.

काश्मीरमधील स्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. जम्मू-काश्मीरमधून हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. त्यामुळेच अध्यक्ष निवडीची प्रक्रिया स्थगित ठेवून कार्यकारिणीत काश्मीरबाबत चर्चा करण्यात आली. काश्मीरमध्ये नेमके काय चालले आहे, याची वस्तूस्थिती सरकारने आणि सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान मोदी यांनी देशापुढे ठेवायला हवी. यावर आम्हाला पारदर्शकपणा अपेक्षित आहे, असे राहुल यांनी माध्यमांना सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!