Aurangabad : काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्यांचे कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत, काँग्रेसला ४० जागांचा प्रस्ताव कायम – प्रकाश आंबेडकर

लोकसभा निवडणुकीदरम्यान आम्ही भाजपची ‘बी टीम’ असतो आणि विधानसभेत आम्हाला सोबत या म्हणता. त्यामुळे आम्ही भाजपची बी टीम होतो का याचा काँग्रेसने आधी खुलासा करावा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्यांचे कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या पक्षात फुट पडत आहे. आम्ही त्यांना ४० जागांची ऑफर दिली होती. आम्ही जोपर्यंत वंचितचे २८८ जागांवर उमेदवार जाहिर करत नाही, तोपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीने ही ऑफर कायम असल्याचे समजावे आणि निर्णय घ्यावा, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरही जोरदार टीका केली.
प्रकाश आंबेडकर गोर बंजारा समाजाच्या सत्तासंपादन मेळाव्यात आले होते. या मेळाव्यात खासदार इम्तियाज जलील यांचीही उपस्थिती होती . या दोन्हीही नेत्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. यावेळी खासदार इम्तियाज जलील म्हणाले, सरकारने तीन तलाकवर कायदा केला, पण मोदींनी स्वतः देखील लग्न केले आहे, मग ते नांदत का नाही ? असा खोचक प्रश्न आंबेडकरांनी केला.
यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले, “नरेंद्र मोदी आपल्याला हुलकावणी देत आहेत. पण आपल्याला त्यांचे थापेबाजीचे राजकारण मोडून काढायचे आहे. वंचितांना हलकेपणाची किंवा श्रेष्ठत्वाची भावना नेहमीच सत्तेपासून दूर ठेवत आली आहे. त्यामुळेच हलकेपणा आणि श्रेष्ठत्व सोडली पाहिजे.” यावेळी ते म्हणाले, “आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला कधीही तत्त्वे नव्हती, त्यांनी नेहमीच केवळ स्वतःला तत्त्वांचा मुलामा दिला. तसेच वर्तमानपत्रांनी त्यांना जास्तीचे महत्त्व दिले. काँग्रेस आणि त्यांच्या पुढाऱ्यांनी भ्रष्टाचार केला. त्याचा पाढा आरएसएस आणि भाजपने वाचला. त्याचाच त्यांना फायदा झाला.” असे आंबेडकर म्हणाले.
इम्तियाज जलील
लोकसभा निवडणुकीत आम्ही सगळे गुंतलेलो होतो, पण आता मोकळे आहोत. तुम्ही फक्त सांगा कुठून निवडणूक लढवायची, लोकसभा तो झाँकी थी, विधानसभा की पिक्चर अभी बाकी है,” अशा शब्दांत खासदार इम्तियाज जलील यांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपला इशारा दिला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबडेकर विजयी होतील आणि आमच्या सोबत संसदेत असतील याची खात्री होती, पण तसे घडले नाही. एका पराभवाने खचून जायचे नाही. बाळासाहेब राज्यात धमाका करतील आणि आम्ही संसदेत करू. आज देशात ज्या काही चांगल्या गोष्टी घडत आहेत त्या मोदींमुळेच, असा दावा सत्ताधारी पक्षांकडून केला जातोय. पण त्यात तथ्य नाही, खरी परिस्थिती काय आहे, हे आम्ही दाखवत राहू आणि सरकारला जाब विचारतच राहू. लोकसभा निवडणुकीत मी विजयी झालो तो केवळ बाळासाहेब आंबेडकरांमुळेच.”
आता एवढ्यावरच थांबायचे नाही, आगामी विधानसभेत सर्व रंगांचे झेंडे तिथे पोहोचले पाहिजेत. बंजारा समाजाने आतापर्यंत फक्त मतदान केले, पण आता संकल्प करा, जो आम्हाला न्याय देईल त्यालाच मत देणार, असे आवाहन इम्तियाज जलील यांनी उपस्थितांना केले.