Aurangabad Crime : चारित्र्याच्या संशयावरून त्याने पत्नीचा गळा आवळला आणि स्वतःच पोलीस ठाण्यात हजार झाला

चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना वाळूज महानगरमधील पवननगर भागात उघडकीस आली आहे. ममता आनंद लोखंडे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे तर आनंद लोखंडे असे आरोपी पतीचे नाव आहे.
वाळूज एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिलेली माहिती अशी की, मागील काही दिवसांपूर्वी ममता बेपत्ता होती. ती नाशिकमध्ये सापडली. दरम्यान तिच्यासोबत घराजवळ राहणार एक तरुण होता. हे पाहून पती आंनदचा राग अनावर झाला होता. त्याने तरुणास बेदम मारहाण करून ममताला घरी आणले होते.
नंतर पती-पत्नीत नेहमी खटके उडत होते. शनिवारी सकाळी दोघांत कडाक्याचे भांडण झाले. काही वेळात वाद निवळला परंतु आनंदच्या डोक्यात राग कायम होता. त्याने मुलगा शाळेत गेल्यावर ममताचा दोन्ही हातानी गळा आवळून तिची हत्या केली. एवढेच नाही तर ती मृत झाल्याची शहनिशा करण्यासाठी त्याने ममताचा गळा पायाने आवळला. ममता मृत झाल्याची खात्री होताच त्याने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे गाठून चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.