Gujrat : काँग्रेसचा राजीनामा देऊन ओबीसी नेता अल्पेश ठाकोर भाजपमध्ये

गुजरातमधील प्रभावी ओबीसी नेते व काँग्रेसचे माजी आमदार अल्पेश ठाकोर यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अल्पेश यांच्यासोबतच माजी आमदार धवलसिंह झाला यांनीही भाजपची वाट धरली आहे. राज्यसभा पोटनिवडणुकीत अल्पेश आणि धवलसिंह यांनी पक्षादेश धुडकावून भाजपच्या बाजूने मतदान केलं होतं. तेव्हापासूनच हे दोघेही भाजपमध्ये जाणार हे स्पष्ट झाले होते.
अल्पेश ठाकोर व धवलसिंह झाला यांनी गुजरात भाजपचे अध्यक्ष जीतू वाघानी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. अल्पेश यांना येत्या काळात गुजरात सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, अल्पेश आणि धवलसिंह यांनी लोकसभा निवडणुकीत उघडपणे काँग्रेस विरोधात प्रचार केला होता. त्यानंतर राज्यसभा पोटनिवडणुकीतही त्यांनी पक्षादेश धुडकावला. अमित शहा आणि स्मृती इराणी लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने राज्यसभेच्या रिक्त झालेल्या दोन जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या. भाजपकडून एस. जयशंकर आणि जुगलजी ठाकोर यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत अल्पेश आणि धवलसिंह यांनी पक्षाचा व्हिप मोडून या दोघांना मतदान केले होते. मतदानानंतर अल्पेश यांनी उघडपणे आपल्या कृतीचे समर्थन केले होते. देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी झटणाऱ्या इमानदार राष्ट्रीय नेतृत्वाच्या बाजूने मी मतदान केले आहे, असे अल्पेश म्हणाले होते. तेव्हापासूनच अल्पेश भाजपच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले होते.