मुख्यमंत्री तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा होणार , धनंजय मुंडे यांना विश्वास

‘विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपचा किंवा शिवसेनेचा नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा मुख्यमंत्री होणार,’ असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरुन कलगीतुरा रंगत आहे. याबाबत भाष्य करताना धनंजय मुंडेंनी हे वक्तव्य केलं आहे.
मुंबईतील राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी सरकारवर चौफेर टीका केली. ‘भाजपच्या कालच्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नव्हता. हे विस्मरण कसं झालं?शिवाजी महाराज स्मारकाची अजून एक वीटही रचली गेली नाही. आता शिवशाही सरकार आणू म्हणतात. पण भाजपने त्यांचा अपमान केला आहे,’ असं म्हणत शिवस्मारकावरून धनंजय मुंडे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
‘पीक विमा कंपन्यांची ऑफिस गेली पाच वर्षे मुंबईत आहेत. हे पाच वर्षांनी उद्धव ठाकरे यांना आता कळालं का? पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विमा दिला नाही. मतांची गरज आहे म्हणून आता शेतकरी आठवला का? पाऊस पडायला लागला तेव्हा दुष्काळ दौऱ्यावर तुम्ही निघणार आहात. उन्हाळ्यात शेतकरी होरपळत असताना तुम्ही विदेश दौऱ्यावर गेला होता,’ असं म्हणत धनंजय मुंडेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.