दहावीला ९४ टक्के मिळवणाऱ्या अक्षयची प्रवेशाच्या चिंतेतून आत्महत्या

वर्षभर इयत्ता दहावीत चिकाटीने अभ्यास केल्यानंतर ९४.२० टक्के गुण मिळाले. मात्र प्रवेशाच्या चिंतेमुळे महाविद्यालयाचे शैक्षणिक शुल्क व देणगी कुठून द्यावयाची, या विवंचनेतून गुणवंत विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा अर्ध्यावरच संपवली. गुरूवारी दुपारी देवळाली येथील राहत्या घरी अक्षय शहाजी देवकर (१६) याने आत्महत्या केली.
देवळाली येथील शहाजी देवकर यांची पाच एकर कोरडवाहू शेती आहे. अक्षय हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असताना नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत ९४.२० टक्के गुण मिळवून अक्षय ग्रामस्थांच्या कौतुकास पात्र ठरला होता. गणितामध्ये त्याला ९९ गुण मिळाले. आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी वडिलांचीही धडपड सुरू होती.
त्यांनी प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अक्षयला लातूरच्या साने गुरूजी माध्यमिक विद्यालयात शिक्षणासाठी ठेवले. दहावीचा निकाल लागल्यापासूनच अक्षय हा निराश होता. त्याला लातूरच्या राजर्षी शाहु कॉलेजला प्रवेश घ्यायची इच्छा होती. यासाठी नाव नोंदणीही केल्याचे कळते. परंतु, आपला प्रवेश होईल की नाही ही चिंता त्याला सतावत होती. मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही तर शिष्यवृत्तीही मिळणार नाही या नैराश्यातून त्याने गुरूवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी दत्तात्रय भागवत देवकर यांनी दिलेल्या माहितीवरून शिराढोण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्राथमिक शाळेपासूनच अक्षय हा अभ्यासात अतिशय हुशार विद्यार्थी होता. हलाखीची परिस्थीती असूनही वडिलांनी त्याला लातूर येथे माध्यमिक शिक्षणासाठी ठेवले होते. त्याची डॉक्टर होण्याची इच्छा होती, असे त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले. परंतु, त्याच्या आत्महत्येमुळे देवकर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.