छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला अंतर्गत धक्का, उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्त्यांचा संताप
उमेदवारी नाकारल्याने कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. नेत्यांच्या गाड्यांना घेराव, फोटोफाड आणि आत्मदहनाचा प्रयत्न. निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप, घराणेशाहीवर थेट बोट.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमधील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली असून महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी न मिळाल्याने इच्छुक उमेदवारांनी आक्रमक आंदोलन केलं. या आंदोलनामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
संतप्त कार्यकर्त्यांनी भाजप नेते भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांच्या वाहनांना घेराव घातला. यावेळी घोषणाबाजी, फोटो फाडणे, गाड्यांवर काळं फासणे असे प्रकार घडले. काही कार्यकर्त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली.
पक्षपात आणि घराणेशाहीचे गंभीर आरोप
आंदोलक कार्यकर्त्यांनी अतुल सावे यांच्यावर पीए आणि नातेवाईकांना तिकीट दिल्याचा आरोप केला. सर्वेक्षण न दाखवता उमेदवारी जाहीर केल्याने अन्याय झाल्याचं ते म्हणाले. “आम्हाला न्याय हवा आहे, अन्यथा आंदोलन तीव्र करू,” असा इशाराही यावेळी देण्यात आला.
महिला कार्यकर्त्यांचा आक्रोश
याआधी भाजपच्या प्रचार कार्यालयातही गोंधळ झाला होता. 40 वर्षांपासून पक्षासाठी काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा इशारा देत संताप व्यक्त केला. काही महिलांना आंदोलनादरम्यान भोवळ आल्याचंही पाहायला मिळालं.
BMC निवडणुकीआधी महायुतीत वादळ; रामदास आठवले नाराज, मुंबईत RPI स्वबळावर निवडणूक लढवणार
आक्रमक वातावरण, मंत्र्यांचा माघार
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच मंत्री अतुल सावे यांनी मागच्या दाराने निघून जाण्याचा मार्ग स्वीकारला, अशी माहिती समोर आली आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर घडलेली ही घटना भाजपसाठी अंतर्गत असंतोषाची धोक्याची घंटा मानली जात असून, याचा निवडणूक निकालांवर परिणाम होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

