Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कोकाटेंच्या अडचणी वाढल्या : शिक्षा कायम, अटक वॉरंट जारी; आमदारकी-मंत्रिपद रद्द होण्याची शक्यता

Spread the love

महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने कोकाटे यांना सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्याने त्यांची आमदारकी आणि मंत्रिपद दोन्ही धोक्यात आले आहे. न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले असून, दोघांनाही कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

न्यायालयाचा दिलासा नाकारला

कोकाटे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे कारण पुढे करत त्यांच्या वकिलांनी सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आणि शिक्षेची अंमलबजावणी कायम ठेवली.

शासकीय सदनिका गैरव्यवहार प्रकरण

१९९५ साली शासकीय कोट्यातील १० टक्के राखीव सदनिका वाटपात गैरव्यवहार केल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याआधी २० फेब्रुवारी २०२५ रोजी प्रथम वर्ग न्यायालयानेही त्यांना हीच शिक्षा सुनावली होती. आता जिल्हा व सत्र न्यायालयाने ती शिक्षा कायम ठेवल्याने प्रकरण निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे.

आमदारकी रद्द होण्याची प्रक्रिया सुरू

लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन वर्षांची किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास आमदारकी आपोआप रद्द होते. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाची अधिकृत प्रत विधिमंडळाकडे पोहोचताच कोकाटे यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मंत्रिपदही जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

कोकाटे बंधू ‘नॉट रिचेबल’

अटक वॉरंट जारी झाल्यानंतर माणिकराव कोकाटे आणि विजय कोकाटे सध्या संपर्कात नसल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कोकाटे बंधूंशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे.

१९९५ च्या प्रकरणाचा तपशील

मुख्यमंत्री कोट्यातील १० टक्के राखीव सदनिका कमी दरात मिळवण्यासाठी कोकाटे बंधूंनी बोगस कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यांनी स्वतःला अल्प उत्पन्न गटातील दाखवून शहरात स्वतःचे घर नसल्याचे कागदपत्रांद्वारे सिद्ध केले आणि नाशिकमधील उच्चभ्रू भागात दोन सदनिका मिळवल्या. या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून १९९७ मध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण चार आरोपी आहेत.


Smart Water Bottle Glows & Beeps to Remind You to Drink More 600 ml Chug Cap Bottle 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!