Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्या वकिलांविरुद्ध अखेर न्यायालयात अवमान याचिका….

Spread the love

नवी दिल्ली : अखेर केंद्र सरकारच्यावतीने सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू असताना अचानक सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रकार करणाऱ्या वकिलांविरुद्ध अवमान याचिका सूचिबद्ध करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आली आहे. हा गैरप्रकार करणारा वकील राकेश किशोर यांच्या विरोधात अवमानना याचिका दाखल करण्यात आली आहे.

एका याचिकेवर सुनावणी सुरूअसताना मधेच एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकला. यानंतर देशभरात एकाच खळबळ उडाली असून या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे . दरम्यान या कृत्याबाबत आपल्याला खंत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली असल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्याविरुद्ध न्यायालायने कुठलीही कारवाई केली नव्हती. मात्र आता आरोपी वकील राकेश किशोर यांच्याविरुद्ध फौजदारी अवमान खटला सुरू करण्यास अॅटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी संमती दिली आहे. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष ज्येष्ठ वकील विकास सिंह आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी संयुक्तपणे दुसरे वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर हा मुद्दा उपस्थित केला आणि फौजदारी अवमान खटला सूचीबद्ध करण्याची मागणी केली.

घटनात्मक अखंडता धोक्यात आली

सिंह यांनी खंडपीठाला माहिती दिली की, मी अॅटर्नी जनरलची संमती घेतली आहे. उद्या सुनावणी व्हावी अशी आमची मागणी आहे. सॉलिसिटर जनरल मेहता म्हणाले की, मी तुम्हाला अवमान खटला दाखल करून घेण्याची विनंती करतो. कारण, यामुळे घटनात्मक अखंडता धोक्यात आली आहे. न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठाने विचारले की, हा मुद्दा पुढे नेलाच पाहिजे का, स्वतः सरन्यायाधीशांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले आहे. यावर न्या. कांत म्हणाले की, सरन्यायाधीश अत्यंत उदार आहेत.

सोशल मीडियावर या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा, न्यायव्यवस्थेचे नुकसान

ज्या पद्धतीने या प्रकरणावर चर्चा सुरू आहे आणि सोशल मीडियावर ज्या पद्धतीने हे प्रकरण प्रमाणाबाहेर पसरवले जात आहे, त्यामुळे न्यायव्यवस्थेचे नुकसान होत आहे. महासचिव म्हणाले की, वकिलाविरुद्ध कोणतीही कारवाई न करणे हे सरन्यायाधीशांच्या उदारतेचे प्रतीक आहे. काही लोक ज्या पद्धतीने या घटनेचे समर्थन करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहेत, तो चिंतेचा विषय आहे. ही संस्थात्मक अखंडतेची बाब आहे, असे तुषार मेहता म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने केली महत्त्वाची टिपण्णी

खंडपीठाने पक्षकारांना विचारले की, हा मुद्दा पुन्हा उपस्थित केल्याने, ज्यांना प्रसिद्धीच हवी आहे, त्यांना आणखी संधी मिळणार नाही का, अशी विचारणा करत, यामुळे न्यायालयाचा वेळ इतर प्रमुख प्रकरणांपासून दुसरीकडे वळवला जात आहे. विकास सिंह यांनी निदर्शनास आणून दिले की, राकेश किशोर यांनी त्याच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चात्ताप व्यक्त केलेला नाही. ते त्या कृत्यांचे कौतुक करणारी विधाने जारी करत आहे. यावर खंडपीठ म्हणाले की, ही याचिका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना पैसे कमविण्याची संधी प्रदान करेल.

दरम्यान, भर न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्रात विरोधी पक्षांकडून निषेध आंदोलने करण्यात आली. राकेश किशोर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राकेश किशोर यांचे सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!