MarashtraPoliticalUpdate : तुझे माझे जमेना , तुझ्यावाचून करमेना …. देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्याची गवसणी !!
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाच थेट सत्तेत येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. देवेंद्र फडणवीस आज विधान परिषदेत बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यांचा निरोप समारंभ आज सभागृहात पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना आपल्यासोबत येण्याची ऑफर दिली. यावरून फडणवीस यांची अवस्था तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशीच झाली असल्याचे दिसून येत आहे.
“अंबादास दानवे यांचा आज निरोप समारंभ आहे. आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी पुन्हा या समारंभात यावं. आल्यानंतर त्याच पदावर असं काही नाही. मी असं म्हटल्यावर हे म्हणतील की पळवापळवी करतोय म्हणून. उद्धवजी! आता उद्धवजी 2029 पर्यंत काही स्कोप नाही. आम्हाला तिकडे यायचा स्कोप उरला नाही. तुम्हाला इकडे यायचा स्कोप… विचार करता येईल. त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करु. पण आम्हाला तिकडे यायचा स्कोप हा उरलेला नाही”, असं देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले.
विधिमंडळात आज जेंव्हा मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची समोरासमोर भेट झाली तेंव्हा दोघांनीही एकमेकांना शेकहॅंड केला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर सभागृहात उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी ज्या देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे तीन तेरा वाजवले त्या भाजपसोबत आणि फडणवीस यांच्यासोबत उद्धव ठाकरे जाण्याची सूतराम शक्यता नाही. तरीही फडणवीस यांचे प्रयत्न चालूच आहेत हे मात्र आज पुन्हा दिसून आले.
