MaharashtraPoliticalUpdate : मराठी विजय मेळाव्यात दोन भावांनी फोडल्या डरकाळ्या ….
मुंबई : होणार होणार म्हणून गाजत असलेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन भावांचा मराठी विजय मेळा अखेर झाला. खरे तर हा ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचा मेळावा होता आणि निमित्त होते मराठी विजयी मेळाव्याचे. या मेळाव्यात भव्य मंचावर महाराष्ट्राचा नकाशा आणि दोन बंधूंच्या दोन खुर्च्या आणि समोर मराठी लोकांची अर्थातच दोन्हीही सैनिकांची तुडुंब गर्दी असे चित्र महाराष्ट्राला दिसले. या गर्दीत अपेक्षेप्रमाणे दोन्हीही ठाकरेंची गर्जना आणि भाजपने वापरल्याचा खदखद दिसून आली. अर्थातच या दोन भावांच्या एकत्र येण्यामुळे महाराष्ट्राच्या आणि खासकरून मुंबई महापालिकेच्या राजकारणात भाजपला नक्कीच फटका बसणार हे उघड आहे. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी दोन भावांच्या मिलनाची श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. त्यांनी सक्तीच्या हिंदीची भूमिका घेतली नसती तर एकत्र येण्यासाठी विषय मिळाला नसता असे उद्गार काढले . उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे यांना आपल्या स्टाईलमध्ये नेहमीप्रमाणे बोकालून काढले.
सक्ती करण्याचा प्रयत्न केला, तर शक्ती अशी दाखवू पुन्हा डोकं वर काढणार नाही, असा गर्भित इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. म महापालिकेचा नाही, महाराष्ट्राचा सुद्धा आहे, आम्ही तो काबीज करू, असेही उद्धव यांनी निक्षून सांगताना राज यांच्यासोबत युतीचे संकेत दिले. उद्धव ठाकरे यांनी मराठे मराठेतर, ब्राह्मण बाह्मणेतर, कोकण कोकणेतर असा कोणताही भेदभाव न करता मराठी म्हणून एकजूद दाखवा. आपली ताकद एकजुटीसाठी असली पाहिजे, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले. वरळी डोममध्ये आज मराठी विजयोत्सव साजरा करण्यात आला. या मेळाव्याला राज आणि उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले.
यांची जोखड फेकून दिली पाहिजे
उद्धव ठाकरे म्हणाले की, आता भांडू नका, आपली मराठी म्हणून एकजूट कायम राहिली पाहिजे. त्यांनी पुढे सांगितले की, भाजपने विधानसभा बटेंगे तो कटेंगे त्यांनी मराठे मराठेतरांनामध्ये केलं. हरियाणात जाटांना भडकावलं, गुजरातमध्ये पटेलांना भडकावलं आणि सत्ता काबीज केली. महाराष्ट्राच्या निवडणुकीत मराठा पेटवून मराठेतर एकत्र केलं. मराठी माणूस मराठी माणसाशी भांडला आणि दिल्लीतील दोघांची गुलामी करू लागल्याचे ते म्हणाले. यांची आता जोखड फेकून दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतून गुजरातमध्ये सुरु असलेली पळवापळवी आणि अदानींना मिळत चाललेल्या भूखंडावरुनही हल्लाबोल केला. त्यांनी सांगितले की, सर्वाधिक कर्जबाजारी शेतकरी महाराष्ट्रात आहे. मुंबईतील मराठी रंगभूमी दालनाची जागा मित्राला देऊन टाकली. मराठी भाषा केंद्र रद्दबातल केले. अख्खी मुंबई कोणाच्या घशात घालत आहेत? सर्वाधिक जागा मित्राच्या घशात घालत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
एकनाथ शिंदेंवर टीका
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुजराती जयजयकारावरही उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले की, एक गद्दार बोलला, जय गुजरात. किती लाचारी करायची, अशी विचारणा त्यांनी केली. हिंदी सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांचा विचारांचा पाईक होईल का? अशी विचारणा त्यांनी केली.
आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर : राज ठाकरे
दरम्यान, राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, आजचा मेळाव्याला घोषणा हीच आहे कोणताही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा. मराठीकडे कुणी वाकड्या नजरेने पहायचं नाही. कुणाला न विचारता निर्णय लादला. तुमच्याकडे सत्ता आहे विधान भवनात आणि आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर. दादासाहेब भुसे आले होते म्हणत होते मी काय बोलतो ते ऐकून घ्या. मी म्हणालो ऐकून घेईल पण ऐकून घेणार नाही. मला म्हणे केंद्राच्या शिक्षण धोरणात हिंदी मुद्दा आहे. महाराष्ट्रात यांनी प्रयत्न करून पाहिला. दक्षिणेतील राज्य याना विचारत पण नाही त्याशिवाय का यांनी माघार घेतली. उत्तर प्रदेश बिहार राजस्थान कोणता विषय तिसरा घेणार आहेत. मराठीच तिसरा विषय घ्यायला हवा. एक भाषा उभी करायला प्रचंड ताकद लागते. भाषा अशाच उभ्या राहत नसतात. अमित शाह म्हणतात ज्याला इंग्रजी येत त्याला लाज वाटेल इंग्रजी येते म्हणवून. पण तुम्हाला येतं कुठे? ते पुढे म्हणाले की, आम्ही मराठी भाषा कधी लादली का? हिंदी फक्त 200 वर्ष पूर्वीची आहे. यांनी आत्ता चाचपडून पहिलं. याना काय मज्जाक वाटला का सक्ती करायला? अशी विचारणा त्यांनी केली. वेगळा ठिकाणी प्रयत्न करून पहिले. ठाकरेंची मुलं इंग्रजी शाळेत शिकले मग काय झालं?? देवेंद्र फडणवीस इंग्रजी शाळेत शिकले दादा भुसे मराठी शाळेत शिकून मंत्री झाले. कुणाची मुले कुठे शिकतात याची लिस्ट आहे आमच्याकडे असे सांगत त्यांनी देशातील नेत्यांची यादीच वाचून दाखवली.
