शेकापला खिंडार , जयंत पाटील यांचे भाऊ आणि भाचे भाजपमध्ये दाखल !!!

मुंबई : विचारधारा कोणतीही असो आणि पक्ष कोणताही असो , राज्यात सत्तेत आल्यानंतर भाजपने विरोधकांना धक्के देत असतानाच विविध नेत्यांच्या पक्षप्रवेशांचा जणू सपाटाच लागला आहे. शतप्रतिशत भाजप म्हणणाऱ्या भाजपने आता शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांच्या घरातच पाऊल ठेवत शेकापला खिंडार पाडले आहे.
गेल्या दोन अडीच महिन्यांत भाजपमध्ये अनेक पक्ष प्रवेश झाले. राज्यात सरकार आल्यानंतर सत्तेचा फायदा डोळ्यासमोर ठेवून भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू असून, भाजपने आता मोठ्या माशांना गळाला लावलंय.. एखाद्या बड्या नेत्याचा चुलता, त्याचा भाऊ यांनाच पक्षात घेण्याचे सत्र आता भाजपमध्ये सुरू झाले आहे.
असाच एक पक्षप्रवेश नुकताच भाजप प्रदेश कार्यालयात पार पडला. जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील आणि भाचे आस्वाद पाटील यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
भाजपमध्ये प्रवेश केलेले पंडीत पाटील कोण आहेत ?
पंडित पाटील हे शेकापचे माजी आमदार रायगड जिल्हा बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांचे धाकटे बंधू असून अलिबाग विधानसभा मतदारसंघातून 2014 साली त्यांनी शेकापकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. अलिबाग विधानसभेवर त्यांनी शेकापचा झेंडा फडकवला होता. रायगड जिल्ह्यामध्ये शेकापचा मोठा दबदबा आहे. प्रत्येक निवडणुकीत शेकापची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरते
दरम्यान गेल्या दोन दिवसात कागलचे माजी आमदार संजय घाडगे, शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा, काँग्रेस नेते प्रसाद हिरे, फलटणचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, माजी नगरसेविका मधुबाला भोसले, दिलीप सिंह भोसले यांनी हाती कमळ घेतले आहे.