MaharashtraPoliticalUpdate : राज ठाकरे , एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे उलट सुलट चर्चा

मुंबई: महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरु असतानाच त्यांनी मनसे नेते राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे . मंगळवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये डिनर डिप्लोमसी झाली असल्याची चर्चा आहे.
दरम्यान आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना शह देण्यासाठी आणि मुंबईतून ठाकरे सेनेला हद्दपार करण्यासाठी एकनाथ शिंदे हे राज यांच्याशी हातमिळवणी करतील, अशी चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांसाठी मुंबई, ठाण्यासह इतरही महापालिकांच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. या भेटीवरून शिंदे राज ठाकरे यांना स्वतः भेटले की अमित शाह यांच्या खलबतानंतर ही भेट झाल्याने या भेटीमागे भाजप आहे काय ? असा प्रश्नही चर्चिला जात आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर भाजपचा विषय असा आहे की , काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुतीला राज ठाकरे सोबत हवे आहेत परंतु भाजपने सोबत न घेता त्यांना शिंदे गटाशी युती करण्याची भाजपची चाल असू शकते असे बोलले जात आहे.
अमित शाह यांच्याशी गुफ्तगू …
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रायगडमधील दौऱ्यावेळी भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटातील रुसवेफुगवे दिसून आल्याची चर्चा सुरू होती. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मुंबईत स्वतंत्रपणे भेट घेतली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या नाराजीचा पाढा वाचला. शिंदे यांनी शहा यांच्याकडे महायुतीत आपल्या पक्षाची होणारी उपेक्षा, बजेटमध्ये त्यांच्या मंत्र्यांच्या खात्यांना मिळालेला कमी निधी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थ खात्याच्या निर्णयांविषयी असलेली नाराजी, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासन सुधारणांच्या मुद्द्यांवर तक्रार केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेणार?
एका बाजूला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर एकनाथ शिंदे यांनी आपली खदखद व्यक्त केल्याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर काही दिवसांतच शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता एकनाथ शिंदे हे आपल्या दरेगावी जाणार असल्याची माहिती आहे. दरेगावात किती दिवस ते मुक्काम करणार, याची माहिती समोर आली नाही.
एकनाथ शिंदे हे नाराज असल्यानंतर अथवा मोठा निर्णय घेण्याआधी आपल्या दरेगावी जात असल्याची यापूर्वी दिसून आल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जाते. त्यामुळे आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे दरेगावी जाणार असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत.