एकनाथ शिंदे मोदींच्या डस्टबीनमध्ये होते , असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदे यांना का लगावला ?

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात शिवसेना उबाठा पक्षाच्या आमदारांना आणि माई मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले होते. त्यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन माफी मागितली होती, असा दावा केला होता. शिंदे यांच्या या दाव्यावर उद्धव ठाकरे यांनी एका वाक्यात शिंदे यांना प्रत्युत्तर देताना, “होय, तेव्हा एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदी यांच्या डस्टबीनमध्ये होते. आम्हाला कळलंच नाही. चला जय हिंद,” असा खोचक टोला लागवल्यानंतर एकच हशा पिकला.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून निर्माण झालेला वाद आणि नागपूरमध्ये निर्माण झालेली दंगलसदृश स्थिती यावर आपली भूमिका माध्यम प्रतिनिधींसमोर मांडली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी पत्रकारांनी त्यांना ‘तु्म्ही दिल्लीत जाऊन नरेंद्र मोदी यांच्यापुढे माफी मागितली असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे, त्यात काय तथ्य आहे,’ असा सावाल केला. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होता. तो महाराष्ट्रातील मातीला जिंकू शकला नाही. महाराष्ट्राने त्याला मूठमाती दिली. अशा औरंगजेबाचं समर्थन कोणीही शिवप्रेमी करणार नाही. कोणी त्याचं थडगं उखडण्याची भाषा करत असेल तर भाषण आणि आंदोलन करू नये, ती उखडून दाखवावी. तसेच डबल इंजिन सरकार नुसत्या वाफा सोडत आहे का? मुख्यमंत्र्यांनी औरंगजेबाची कबर उखडण्यात असमर्थता दाखवली आहे. औरंगजेबाच्या कबरीला केंद्राचं संरक्षण आहे, असंही ठाकरे म्हणाले.
एकनाथ शिंदे काय म्हणाले होते ?
एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळात निवेदन देत असताना उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचे नाव न घेता भाष्य केलं. “यांचे प्रमुख मोदी साहेबांना जाऊन भेटले. मला माफ करा, असे म्हणाले. मला म्हणाले आम्ही पुन्हा येतो. पण इकडे येऊन पलटी मारली,” असे एकनाथ शिंदे विधानपरिषदेत बोलताना म्हणाले.
दरम्यान यावेळी, सत्ताधाऱ्यांना नागपूरच्या घटनेवरुन सरकारला धारेवर धरणाऱ्या शिवसेना उबाठा पक्षाच्या आमदारांना एकनाथ शिंदेंनी आक्रमक शैलीत सुनावलं. तर, महाविकास आघाडीच्या काळातील घटनांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंवरही हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं. खुर्चीसाठी यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले. तुम्ही काँग्रेस सोबत जाऊन खुर्ची मिळवलीस, पण विचारधारा सोडली. ह्यांचे प्रमुख हे गेले होते लोटांगण घालून आले. मला वाचवा मला वाचवा म्हणाले तिथ जाऊन सांगून आले की आम्ही महायुती सरकारमध्ये सामील होऊ. मात्र, त्यांचा डाव मी पलटवून टाकला. नोटीस आल्यावर गेले होते लोटांगण घालायला, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी सभागृहात गौप्यस्फोटांची मालिकाच लावली.
महाविकास आघाडी सरकार असताना देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांना जेलमध्ये टाकण्याचा त्यांचा डाव होता. औरंग्याचे विचार यांनी घेतले, मात्र मी बाळासाहेबांना सोडलं नाही. त्यामुळे, माझ्यासोबत 60 लोक आले, हिंदुत्वाचं सरकार मी आणलं. तुम्हाला फक्त 20 लोक निवडून आणता आले, असे म्हणत जनतेचा कौलही आमच्याच बाजुने असल्याचे एकनाथ शिंदेंनी म्हटले. एक अंदर की बात सांगतो ह्यांचे प्रमुख मोदींना भेटायला गेले आणि माफी मागू लागले मला वाचवा. अनिल परब तुम्ही देखील दिल्लीला गेला होतात आणि तिथ जाऊन माफी मागितली आणि राज्यात माघारी येऊन पलटी मारली, असा गौप्यस्फोटच एकनाथ शिंदेंनी सभागृहात केला.