दंगल भडकवण्यामागे षडयंत्र कोणाचं आहे ? आ. टी राजा याने स्वत: हातात कुदळ घेऊन फोडावी , राज्य भडकवू नये : आ. अमोल मिटकरी

मुंबई : औरंगजेबाच्या कबरीला हटविण्यावरुन नागपुरातील महाल परिसरात सायंकाळी तरुणांच्या दोन गटांत भीषण राडा झाला. यातून वातावरण तापले व मोठा जमाव रस्त्यांवर उतरला. यात काही असामाजिक तत्त्वांनी जाळपोळ केली व पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत धक्काबुक्की केली. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या दंगलीवरुन सवाल उपस्थित केले आहेत.
विविध माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये आमदार अमोल मिटकरी यांनी अनेक प्रश्न उपस्थित करीत सरकारला घरचा आहेर दिला . आमदार मिटकरी म्हणाले,दंगल भडकवणाऱ्यांना माझा प्रश्न आहे. औरंगजेबाची कबर उखडली तर संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील का? महाराष्ट्राचे प्रश्न मिटतील का? नागपुरातील प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला त्यावेळी या संघटना पुढे का आल्या नाहीत?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. नागपुरात झालेल्या दंगलीवरुन मिटकरी यांनी संघटनांवर टीका केली.
मिटकरी म्हणाले, महाराष्ट्राला या दंगली नको आहेत. या दंगल भडकवण्यामागे षडयंत्र कोणाचं आहे? यामागे सरकारला गालबोट लावायचं आहे का? लवकर यावर कारवाई केली पाहिजे. नागपुरात अशा घटना घडणे चुकीच्या आहेत. अशा घटना महाराष्ट्रामध्ये अशोभणीय आहे, असंही अमोल मिटकरी म्हणाले.
“संजय राऊत यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलले पाहिजे, औरंगजेबाची कबर हे पुरातत्व विभागाचा विषय आहे. ती कबर टी राजा याला फोडायची आहे. त्या टी राजा याने स्वत: हातात कुदळ घेऊन फोडायला जायला पाहिजे, असा टोलाही अमोल मिटकरी यांनी लगावला.
‘मुळ प्रश्नाला बगल दिली जातेय…
“सरकारमध्ये असताना माझी अशी मागणी आहे की, मुळ प्रश्नाला बगल दिली नाही पाहिजे. ती दिली जातेय . कुणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाही. मागच्या अधिवेशनात सरपंच संतोष देशमुख आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर होता. आता उर्वरीत प्रश्नाला न्याय दिला पाहिजे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली.