Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने ‘औरंगजेबाची कबर हटा’व असे नारे देत आंदोलन केले आणि पुढे ….. मुख्यमंत्र्यांनी विधान भवनात काय निवेदन केले ?

Spread the love

मुंबई: राज्यात कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर जात-धर्म न पाहता कारवाई करण्यात येईल. तसेच जो कोणी पोलिसांवर हल्ला करेल त्याला सोडले जाणार नाही, असा स्पष्ट आणि कठोर इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. नागपूरच्या महल आणि हंसापुरी परिसरात सोमवारी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निवेदन दिले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वधर्मीय नागरिकांना शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. याठिकाणी गुंतवणूक येत आहे. आपल्याला इच्छित उद्दिष्ट गाठायचे असेल तर नागरिकांना कायदा-सुव्यवस्था राखणे गरजेचे आहे. सध्या अनेक धर्मांचे सण सुरु आहे. त्यामुळे सर्व लोकांना संयम बाळगावा आणि एकमेकांविषयी आदरभाव बाळगावा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराचा सविस्तर तपशील सभागृहासमोर मांडला. नागपूरातील महाल परिसरात सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने ‘औरंगजेबाची कबर हटा’व असे नारे देत आंदोलन केले होते. यावेळी त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली होती. याप्रकरणी गणेश पेठ पोलिसांनी आंदोलकांवर दुपारी 3 वाजून 9 मिनिटांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर वातावरण शांत होते. मात्र, सायंकाळी अफवा पसरवण्यात आली की, सकाळी आंदोलकांकडून जी प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली त्याच्या कापडावर धार्मिक मजकूर होता. हे वृत्त पसरल्यानंतर नमाज आटोपून येत असलेल्या 200 ते 250 लोकांच्या जमावाने नारेबाजी सुरु केली. आम्ही आग लावून टाकू, अशी हिंसक भाषा त्यांनी सुरु केली. तेव्हा पोलिसांनी बळाचा वापर केला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

तत्पूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार द्यायची आहे अशी मागणी केल्यानंतर मुस्लीम समुदायाच्या लोकांना पोलिसांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्यांची तक्रार पोलीस ऐकून घेत होते. तेव्हा हंसापुरी भागात 200 ते 300 लोकांच्या जमावाने हातात काठ्या घेऊन दगडफेक सुरु केली. त्यांच्या तोंडावर फडकी गुंडाळली होती. या जमावाने हंसापुरीत 12 दुचाकींचे नुकसान केले. काही लोकांवर घातक शस्त्रांनी हल्ला केला, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

त्यानंतर भालदारपुरा भागात सायंकाळी साडेसात वाजता 80 ते 100 लोकांच्या जमावाने पोलिसांवर हल्ला केला. तेव्हा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुर आणि सौम्य बळाचा वापर केला. यावेळी जमावाने एक क्रेन आणि काही चारचाकी वाहने जाळली. या सगळ्यात एकूण 33 पोलीस जखमी झाले. यामध्ये 3 उपायुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. तर एकूण पाच नागरिक जखमी झाले. यापैकी तिघांना घरी सोडण्यात आले आहे. दोन जण रुग्णालयात आहेत, त्यापैकी एकजण अतिदक्षता विभागात आहे. एकूण 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागपूर शहरात एसआरपीएफच्या 5 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही…

सकाळच्या घटनेनंतर त्यानंतर मध्यंतरी शांतता होती. त्यानंतर संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक हल्ला केला. कारण पोलिसांना एक ट्रॉली भरुन दगड मिळाले. वरती दगड जमा करुन ठेवण्यात आले होते. शस्त्रास्त्र मोठ्याप्रमाणावर होती. एका डीसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. यामध्ये काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न होता. या लोकांवर कारवाई केली जाईल. कोणालाही कायदा-सुव्यवस्था हातात घेण्याचा अधिकार नाही. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला आहे अशा लोकांना काही झाले तरी सोडले जाणार नाही. पोलिसांवरचा हल्ला सहन केला जाणार नाही. पोलीस शांतता प्रस्थापित करत होते. अशावेळी त्यांच्यावर केलेला हल्ला चुकीचा होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

दरम्यान नागपूरची घटना दुर्दैवी आहे. अमेरिकेने ओसामा बिन लादेनचं थडगं होऊ नये म्हणून त्याला समुद्रात टाकलं. त्यामुळे औरंग्याबाबत तुम्हाला काय प्रेम आहे. काँग्रेस काळात हे थडगं झालं आहे, असे म्हणत संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर कशाला हवीय, असा सवालच एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला.

शिंदे पुढे म्हणाले की , नागपुरात सकाळी साडे अकरा वाजता विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. त्यांच्यावर दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. संध्याकाळी अफवा पसरली की जी चादर जाळली त्यावर धार्मिक मजकूर होता. त्यानंतर संध्याकाळी नमाज पूर्ण झाल्यानंतर लोक रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करू लागले. त्यावेळी दुसऱ्या भागात दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीत 33 पोलीस जखमी झाले असून 3 उपायुक्त दर्जाचे अधिकारी आहेत. एका अधिकाऱ्यावर कुऱ्हाडी वार झाला आहे. सकाळी घटना घडली, पोलिसांनी ती बाब मिटवली होती. मात्र, संध्याकाळी काही लोक आले आणि त्यांनी गोंधळ केला. तलवार, लाट्या काट्या वापरल्या. पोलिसांच्या गाड्यांवर देखील हल्ला केला. चिटणीस पार्क हंसापुरी महाल परिसरातील हा प्रकार आहे. दंगल सदृश परिस्थिती याठिकाणी निर्माण झाली होती, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी सभागृहात दिली. तसेच, औरंगजेब हा लागतो कोण यांचा? लुटारू आहे हा, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी सभागृहात जोरदार भाषण केलं.

अन् बावनकुळेंनी दंगलप्रवण क्षेत्रात जाण्याचा निर्णय बदलला

दरम्यान संचारबंदी लागू केलेली असताना काल दगडफेक, जाळपोळ झालेल्या भागात जाणे योग्य नाही, असे सांगत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रभावित क्षेत्रास न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ठिकाणी पाहणी करायला गेले असता पोलिसांवरचा ताण नाहक वाढेल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांचं म्हणणं आहे. पोलिसांकडून घटनेबद्दलची माहिती घेतल्यानंतर बावनकुळे आता जखमी पोलिसांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत.

नितेश राणे यांना पुढील काही दिवस शांत राहण्याचे आदेश

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील आक्रमक हिंदुत्त्वाचे नवे आयकॉन आणि चेहरा होऊ पाहत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज दिल्याची माहिती समोर आली आहे. नितेश राणे यांनी मंगळवारी मुंबईत विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना पुढील काही दिवस शांत राहण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर नितेश राणे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही भेटले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!