आरक्षणाची लढाई ही फायनल मॅच आता आम्ही मुंबईत खेळणार , जरांगे यांचा सरकारला पुन्हा इशारा

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या मागणीसाठी आमचा मुंबईला जाण्याचा विचार आहे. परंतु मी सध्या काही त्याबद्दल तुम्हाला सांगणार नाही. माझा डाव सांगणार नाही, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला धडकणार असल्याचा इशारा दिला आहे. आरक्षणाची लढाई ही फायनल मॅच असणार आहे. तुम्ही गोड बोलून तर आमचा काटा काढला. पण आम्ही तुम्हाला खेटू आणि आरक्षण घेऊ राहू. मी गोडीत सांगतो, यापुढे आंदोलन लोकशाहीतच होणार आहे. पण मॅच फायनल असणार आहे असे जरांगे यांनी असे म्हटले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, तसेच सगे-सोयरेसह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले असून, त्यांनी आता मुंबईला येण्याची भाषा सुरू केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आणि बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याकांड प्रकरण चांगलेच लावून धरले आहे. यावरून मनोज जरांगे पाटील सातत्याने महायुती सरकारवर टीकेचे आसूड ओढताना दिसत आहेत.
आता खूप ऊन आहे नाहीतर त्यांना आताच हिसका दाखवला असता. मागच्या वेळी मुंबईला गेलो आणि सुखरूप परत आलो. त्यांना तेव्हाच झटका दाखवला असता. आम्हालाही बघायचे आहे की, मंत्री कुठे राहतो, आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांनी मुंबई बघावी की नाही? त्यांनाही पाहावी असे वाटते, असे सांगून जरांगे म्हणाले की , आता डाव कसे टाकायचे? हे आम्हाला चांगले माहिती आहे. परंतु आरक्षण आम्ही घेणारच आहे. अजून थोडे थांबू, पण तयारी अशी करू की चारही बाजूंनी तुम्हाला जायला रस्ता मिळणार नाही. मुख्यमंत्र्यांनी हे लक्षात ठेवावे, असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांनी केला. तसेच यापुढे कमी सांगायचे आणि कमी बोलायचे, आता करून दाखवायचे आहे. इथून पुढे सरकारची चाल खेळावी लागणार आहे. सरकार निवडून येईपर्यंत काही कळू देत नाही, बोलू देत नाही. फक्त गोड बोलते. आता अचानक आंदोलन करायचे. या भूमिकेशिवाय सरकार ठिकाणावर येणार नाही, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.
आरक्षणाची लढाई ही आता फायनल मॅच असणार
आरक्षणाची लढाई ही फायनल मॅच असणार आहे. तुम्ही गोड बोलून तर आमचा काटा काढला. पण आम्ही तुम्हाला खेटू आणि आरक्षण घेऊ राहू. मी गोडीत सांगतो, यापुढे आंदोलन लोकशाहीतच होणार आहे. पण मॅच फायनल असणार आहे. मी आरक्षण मागतोय म्हणजे मला विनाकारण जातीवादी ठरवू नका. तुम्ही आमच्या आरक्षणाला विरोध करत आहात, म्हणजे तुम्हीच जातीवादी आहात. १०० टक्के सरकारकडून फसवणूक झालेली आहे. योग्य वेळी योग्य होणे गरजेचे होते. आम्हाला ओबीसी आरक्षणात जायचे होते आणि ओबीसींचा कायदा दुरुस्त करायचा असला तर त्याची अधिसूचना काढावी लागते. त्यावेळी त्यांनी अधिसूचना काढण्यास विलंब केला. त्यामुळे तिथे आमची फसवणूक झाली, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली.