Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

धमकी आणि शिवरायांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या जामिनावर उद्या सुनावणी….

Spread the love

कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देताना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविरोधात गरळ ओकून फरार झालेल्या प्रशांत कोरटकरला तगडा बसला आहे. उद्या (12 मार्च) कोर्टात प्रशांत कोरटकरला जमीन अर्ज सुनावणीसाठी उपस्थित रहावे की नाही यासंदर्भात निर्णय होणार आहे. आज अंतरिम जामीनाची मुदत संपल्याने प्रशांत कोरटकर कोल्हापूर पोलिसांकडे हजर होणार का? याकडे लक्ष आहे.

कोल्हापूर सत्र न्यायालयात कोरटकरचा अंतरिम जामीनची मुदत आजपर्यंत (11 मार्च) असल्याने सुनावणी झाली. कोल्हापूर पोलिसांच्या जुना राजवाडा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल होताच फरार झालेल्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळाला होता. मात्र, त्याला कोल्हापूर पोलिसांसमोर हजर होण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, प्रशांत कोरटकर अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. राज्य सरकारकडून कोरटकरचा अंतरिम जामीन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. कोल्हापूर सत्र न्यायालयात आमची बाजू ऐकण्यात आली नाही, असेही सरकारने म्हटले होते. या संदर्भात उच्च न्यायालयाने आज (11 मार्च) प्रकरण कोल्हापूरमध्ये प्रलंबित असल्याने कोणताही आदेश न देता कोल्हापूर सत्र न्यायालयाला सरकारची बाजू समजून घेत योग्य निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.

विविध कलमांखाली गुन्हा दाखल

कोल्हापूर सत्र न्यायालयात न्यायाधीश कश्यप यांच्यासमोर सुनावणी पार पाडली. सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी सुद्धा हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. छत्रपती शिवराय हे आमचे दैवत असल्याने आमचे देखील म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणी हस्तक्षेप याचिकेतून करण्यात आली होती. प्रशांत कोरटकरवर जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता 196, 197, 299, 302, 151, 352 कलमानुसार गुन्हे दाखल आहेत. महापुरुषांचा अवमान, दोन समाज तेढ निर्माण करणे, धमकी देणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागुपरातही याच कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. अन्य जिल्ह्यांमध्येही प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल झाला आहे.

आमच्या देवाच्या अपमान आम्ही कसा सहन करायचा?

हस्तक्षेप याचिकेवर बोलताना वकील बाबा इंदुलकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना आम्ही पूजतो, देव मानतो. या आमच्या देवांचा अपमान आम्ही कसा सहन करायचा? आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. म्हणून या प्रकरणात आमचं म्हणणं कोर्ट ऐकणार नसेल, तर कोणाचं ऐकणार आहे? दरम्यान, हस्तक्षेप याचिकांना प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी जोरदार विरोध केला.

असीम सरोदेंचा ऑनलाईन युक्तिवाद

या प्रकरणात इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी ऑनलाइन युक्तिवाद करत प्रशांत कोरटकरने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. मोबाईल इरेज करून सिम कार्ड आणि मोबाईल जमा केल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्यांदा कोरटकरने माझा आवाज नसल्याचे सांगितले आणि दुसरीकडे, मोबाईलमधील डेटा डिलीट केला असल्याचे न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. यावेळी कोरटकरच्या वकिलांनी जे काही मोबाईलमध्ये होते ते अजूनही असल्याचा दावा केला.

गुन्हा दाखल होताच कोरटकर फरार

प्रशांत कोरटकर फरार झाल्यानंतर कोल्हापूर पोलिस त्याच्या मागावर आहेत. मात्र, अजूनही तो पोलिसांना सापडलेला नाही. प्रशांत कोरटकर मुंबईत असल्याची चर्चा असतानाही त्याच्यावर अजून अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही. त्याने आपला मोबाईल पत्नीच्या माध्यमातून पोलिसांकडे जमा केला होता. मात्र, तो मोबाईल फाॅरमॅट करून डेटा डिलीट करण्यात आला होता. त्यामुळे कोरटकरकडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे वकील असीम सरोदे यांनी म्हटले आहे. असीम सरोदे यांनी इंद्रजित सावंत यांच्याकडून बाजू मांडताना कोरटकर क्रिमीनल असल्याचे सांगितले. कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून अंतरिम जामीन देताना गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे म्हटले होते.

कोरटकरडे आहेत एकूण 67 कोटींच्या कार ….

इंद्रजित सावंत धमकी प्रशांत कोरटकर आवाज माॅर्फ करण्यात आला असे म्हणत आहे, तर त्याने व्हाईस सॅम्पल का दिले नाही? आवाज त्याचाच हे मी व्यक्तीगत ओळखतो. या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरडे एकूण 67 कोटींच्या कार आहेत, इतकी प्रगती कशी झाली? मुंबईत असून अटक होत नाही, राजकीय संरक्षण आहे का? अशा प्रश्नांची सरबत्ती वकील असीम सरोदे यांनी केली. सरोदे म्हणाले की, प्रशांत कोरटकर हा विषारी डोक्याचा असून शातीर, बदमाश वक्तीप्रमाणे वागला आहे. कोल्हापूर न्यायालयाने तो क्रिमिनल माईंडचा नसल्याचे सांगितले, पण तो क्रिमिनल असल्याचे सरोदे यांनी सांगितले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!