SantoshDeshmukhaMurderCase : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विरोधकांचा मोठा दबाव होता , राजीनाम्यावर अजित पवार काय म्हणाले ?

मुंबई : संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात वाल्मिक कराडचे नाव समोर आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येवरून विरोधकांच्या दबावामुळे मुंडे यांनी अखेर आज राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. जर धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला नाही तर सभागृहाचे कामकाज रोखतील, असा इशारा आज विरोधकांनी दिला होता.
आज सकाळीच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले होते. आजच धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी करत विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन केलं. जितेंद्र आव्हाड आज प्रतीकात्मक दगड घेऊन विधानभवनात आले. हे सरकार पाषाणहृदयी आहे म्हणून मी हे घेऊन आलो आहे असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, घटनेच्या ८० दिवसांनंतर, देशमुख कुटुंबाच्या संघर्षानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी आज (४ मार्च) त्यांचा राजीनामा दिला आहे. मुंडे यांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की , यावर मी राजकारण करू इच्छित नाही. या प्रकरणातील गुन्हेगारांना त्यांची शिक्षा मिळेल. आज राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारला आहे. पुढील कार्यवाहीसाठी मी तो राजीनामा राज्यपालांकडे पाठवला आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारून आम्ही त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त केलं आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर दोन वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, “धनंजय मुंडे यांनी नुकताच त्यांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिला आहे.”
सरकार बरखास्त करण्याची गरज
कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिल्यानंतर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, “मंत्रिपदाचा राजीनामा पुरेसा नाही. सरकार बरखास्त करण्याची गरज आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडली आहे. यावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही.”
छगन भुजबळ यांनी काय म्हटलं आहे?
धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला आहे हे मला आत्ताच समजलं आहे. यासंदर्भात आता पुढची जी काही भूमिका पक्षाचे अध्यक्ष अजित पवार लवकरच जाहीर करतील. पक्षाची भूमिका हीच होती की कुठल्याही बेकायदेशीर कृत्याला पाठिशी घालणार नाही. आमची भूमिका न्यायाचीच राहिल. कुठल्याही चुकीच्या कृत्याला आम्ही समर्थन देणार नाही. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला धरुन राजीनामा दिला आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरण
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर २०२४ मध्ये अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, एक आरोपी अद्याप फरार आहे. २७ फेब्रुवारी रोजी, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने बीड जिल्हा न्यायालयात सुमारे १,२०० पानांचे आरोपपत्र सादर केले, ज्यामध्ये देशमुख यांच्या हत्येचा आणि त्यासंबंधित दोन प्रकरणांचा समावेश आहे. बीडमधील केज पोलिस ठाण्यात सरपंच देशमुख यांची हत्या, आवदा कंपनीला खंडणी मागण्याचा प्रयत्न आणि कंपनीच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला असे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मनोज जरांगेनी घेतली देशमुख कुटुंबाची भेट
मनोज जरांगे पाटील यांनी आज (४ मार्च) देशमुख कुटुंबियांची भेट घेतली, यावेळी संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले. माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, एकच फोटो बघून मी डोळे झाकले, मला सगळे फोटो बघवलेच गेले नाही. मी तुटून गेलोय, काय करावं काही समजत नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आरोपींना कसं वाचवलं जाईल याचं नियोजन केलं जातंय. पण मारेकऱ्यांना नियती माफ करणार नाही अशी भावना देशमुख माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.