PuneRapeCaseUpdate : स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील आरोपी अखेर गजाआड

पुणे : अखेर पुणे पोलिसांनी तब्बल ७० तासानंतर स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी वासनांध दत्तात्रय गाडे याला मोठ्या शिताफीने मध्यरात्री अटक करण्यात यश मिळवले . गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. आज अखेर तो सापडला. शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद केले.
ग्रामस्थांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील उसाच्या चारीत तो लपला होता. ग्रामस्थांच्या आणि श्वान पथकाच्या मदतीने स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकातील कर्मचारी शंकर संपते, सागर केकान, नाना भांदुर्गे, कुंदन शिंदे आणि सुजय पवार या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला शिताफीने पकडले.
मंगळवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास ही बलात्काराची घटना घडली होती. कौन्सिलर असलेली २६ वर्षीय तरुणी लोणंद या मूळ गावी जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजता स्वारगेट बस स्थानकावर आली होती. ही तरुणी एकटीच असल्याचे पाहून आरोपीने तिच्याशी जवळीक साधली. गोड बोलून ओळख वाढवली आणि स्वारगेट स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये तिला घेऊन गेला आणि ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि पकडले जाण्याच्या भीतीने पळून गेला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. स्वारगेट पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवली आणि त्याला ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या.
पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे काय म्हणाले?
पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी आरोपी ताब्यात असून पुढील तपासासाठी स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. गेल्या तीन दिवसांपासून तो गुनाटमध्ये होताअसे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. गुनाटच्या गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाला मदत केली आहे. गावाच्या एका भागातून ताब्यात घेण्यात आले आहे, असे सांगितले. झोन 2, क्राईमच्या टीम, ड्रोनची पथकं, आसपासच्या जिल्ह्यातील पोलीस पथकं होती. गावकऱ्यांनी मोठं सहकार्य केलं आहे, असे निखिल पिंगळे म्हणाले.
या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त क्त केला जात असल्याने पोलिसांवरील दबाव वाढला होता. त्यामुळे पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी 13 पथके तैनात करून त्याची माहिती देअनारास १ लाखाचे बक्षीसही जाहीर केले होते. मात्र त्याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. तपासादरम्यान त्याचं शेवटचं लोकेशन हे त्याचं मूळ गाव असलेल गुनाट या गावात आढळले होते. बुधवारी रात्री तो शेवटचा याच गावात दिसल्याचं ग्रामस्थांनीही सांगितले. आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी या गावाभोवती आपले लक्ष केंद्रित केले.
१५० ते २०० पोलीस घेत होते शोध …
गुरुवारी दुपारीच १५० ते २०० पोलीस या गनाट गावात दाखल झाले आणि त्यानंतर सुरू झाली सर्च मोहीम. गुनाट गावातील प्रत्येक छोट्या मोठ्या ठिकाणी दत्ता गाडेचा शोध सुरू झाला. या गावाच्या आजूबाजूला उसाची शेती आहे. आरोपी या उसाच्या शेतात लपला असावा अशी शक्यता गृहीत धरून शोध सुरू झाला. उसाच्या शेतात जाऊन, खबरदारी बाळगत पोलीस त्याचा शोध घेऊ लागले. जमिनीवरून पोलीस तर आकाशातून ड्रोन या नराधमाचा शोध घेत होते. अखेर शुक्रवारी पहाटे दीडच्या सुमारास एका शेतातील चारीत या कर्मचाऱ्यांना काही संशयास्पद हालचाल जाणवली आणि त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी धाडसीपणा दाखवत झडप घालून त्या व्यक्तीला पकडले. सोबत असलेल्या ग्रामस्थांकडून हाच दत्ता गाडे असल्याची ओळख पटवली. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपीला घेऊन ही पोलीस कर्मचारी लष्कर पोलीस ठाण्यात पोहोचले.
सध्या आरोपीला लष्कर पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. मात्र बलात्कार प्रकरणातील हा आरोपी सापडल्याने पुणे पोलिसांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला. आरोपी दत्ता गाडे सध्या स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात आहे. आज त्याला कोर्टात हजर केले जाईल. त्याला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर या संपूर्ण घटनेची दुसरी बाजू समोर येईल. मात्र तीन दिवस आरोपी दत्ता गाडेने पुणे पोलिसांना चांगलाच घाम फोडला होता. अखेर पोलीस त्याला पकडण्यात यशस्वी ठरले आहेत. आता या प्रकरणातील तपासावर अखंड महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
रात्री उशीरा नातेवाईकांच्या घरी मदत मागायला गेला…
गुनाट गावातील एका नातेवाईकाच्या घरी आरोपी दत्तात्रय गाडे रात्री १२ वाजता गेला होता. यावेळी त्याने तिथे खूप भूक लागली आहे. काहीतरी खायला द्या. यावेळी नातेवाईकांनी त्याला काही खायला न देता एक पाण्याची बाटली भरुन दिली. यावेळी गाडे याने मी जे केलं ते चुकीचं केलं, मला पश्चाताप झाला आहे, पोलिसांना सरेंडर व्हायचं आहे, असं म्हणाला. त्यानंतर तो पाण्याची बाटली घेऊन तिथून निघून गेला. यानंतर नातेवाईकांनी ही सर्व माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी लगेचच चक्रे फिरवत आसपासच्या शेतात त्याचा शोध घेतला. रात्री दीड वाजता पोलिसांना तो शेतात सापडला.