Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखच्या भावाने दिली धक्कादायक माहिती , सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांची मस्साजोगला भेट….

Spread the love

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेगळंच वळण देण्याचा कट खुद्द बीड पोलिसांनीच रचला होता, संतोष देशमुखांची हत्या ही अनैतिक संबंधातून झाल्याचं दाखवण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी कळंबमध्ये एक बाईही तयार ठेवण्यात आली होती असा आरोप धनंजय देशमुखांनी केला आहे. गावकऱ्यांच्या जागरुकतेमुळे पोलिसांचा हा कट उधळून लावण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी आपली दिशाभूल केल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला.

विशेष म्हणजे, भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत हा मुद्दा पहिल्यांदा मांडताना या प्रकरणाचा उल्लेख केला होता. कळंबमध्ये एक महिला तयार ठेऊन संतोष देशमुखांना बदनाम करण्याचा कट होता असा आरोप त्यांनी केला होता. आता तेच प्रकरण स्पष्टपणे उघड झालं आहे. कळंबमध्ये एका महिलेच्या घरी मृतदेह न्यायचे आणि ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचं दाखवण्याचा पोलिसांचा कट होता असा आरोप धनंजय देशमुखांनी केला.

कळंबच्या दिशेने अँब्युलन्स का वळवण्यात आली?

या प्रकरणावर बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, “मला त्या दिवशी शेवटचा फोन आला आणि संतोष आण्णांना दवाखान्यात न्यायचं आहे असं एका सहकाऱ्याने सांगितलं. पण पोलिसांनी त्यावेळी काय घडलं याची माहिती कुणालाही लागू दिली नव्हती. त्या प्रकरणानंतर अधिकारी बदलले गेले. संतोष देशमुखांना घेऊन जाणारी अँब्युलन्स ही कळंबच्या दिशने निघाली होती. पण त्यामागे मस्साजोगच्या तरुणांच्या गाड्याही होत्या. केजला रुग्णालय आणि पोलिस स्टेशन असताना कळंबच्या दिशेने अँब्युलन्स का नेली जात आहे असा प्रश्न त्यावेळी तरुणांना पडला. त्यामुळे त्यांनी अँब्युलन्सचा पाठलाग केला. त्यामुळे पोलिसांचा हा कट अयशस्वी ठरला.”

कळंबमध्ये एका बाईला तयार ठेवण्यात आलं होतं….

सुरेश धसांनी हा मुद्दा सभागृहात मांडला होता. त्यावेळीही त्यांनी कळंबमध्ये एक महिलेला तयार ठेवण्यात आलं होतं आणि हत्येला वेगळं वळण देण्याचा कट होता असा आरोप केला होता. ते म्हणाले की, “माणसांना मारायचे, हातपाय मोडायचे, रक्तबंबाळ करायचे हे आरोपींचे काम. त्यांनी कळंबमध्ये एका महिलेले पैसे देऊन तयार ठेवलं असायचं. मग छेडछाडीतून त्या व्यक्तीला मारण्यात आल्याचं चित्र निर्माण करायचं. त्यानंतर ती महिला विनयभंगाची केस करायची. असे प्रकार मोठ्या प्रमाणात व्हायचे. या प्रकरणात कुठे केस दाखल करुन घेतली जायची नाही. उलट समाजातून त्या व्यक्तीला उठण्याची वेळ यायची. कारण त्याला तोंड दाखवण्यासाठी जागाच नसायची.”

दरम्यान समाजासाठी लढणाऱ्या होतकरू तरुणाला बदनाम करण्याचा पोलिसांचा आणि आरोपींचा कट होता असा आरोप धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केला.

धनंजय देशमुख म्हणाले की, “या संदर्भात तपासात काहीच झालं नाही. पहिल्या आठ दिवसातील तपास काय झाला याची माहिती आम्ही मागितली तरी त्यावर काही झालं नाही. पोलिसांनी समाजाची दिशाभूल केली. या प्रकरणाचा पुन्हा तपास व्हावा यासाठी आम्ही अर्ज दाखल करणार आहोत.”

पोलिसांना फाशी द्या…

खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मस्साजोग गावाला भेट देत देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी कैफियत मांडताना देशमुख कुटुंबीयांना अश्रू आवरले नाहीत. केज पोलिस स्टेशनमधील त्या दिवशी उपस्थित सर्व पोलिसांनाही फाशी द्या अशी मागणी देशमुख यांच्या पत्नीने केली. यावेळी वैभवी देशमुख हिने या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता असं सुप्रिया सुळे यांना सांगितलं.

कृष्णा आंधळे कुठे गायब झाला, पोलिस काय करतायत, एक फरार आरोपी दोन महिने सापडत नाही यावर आपला विश्वासच बसत नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. संतोष देशमुखांच्या हत्येचं राजकारण करू नये असं आवाहनही त्यांनी केलं. सत्तेची आणि पैशांची मस्ती उतरलीच पाहिजे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!