MaharashtraPoliticalUpdate : एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कार ; थोरल्या पवारांवर उद्धव ठाकरेंची नाराजी

मुंबई : शरद पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कारा’ने सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचे केलेले कौतुक उद्धव ठाकरे यांना पसंत पडले नाही. याबद्दल उद्धव ठाकरे यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली असून एकनाथ शिंदेंचा शरद पवारांनी सत्कार करणं टाळायला हवं होतं, असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान यावरून उद्धव ठाकर यांच्या गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करताना शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्राचे राजकारण हे विचित्र दिशेने जात आहे. एकनाथ शिंदे यांनी बेईमानी करून महाराष्ट्रच सरकार पाडलं. शरद पवारांनी शिंदे यांच्या कार्यक्रमाला जायला नको होतं अशी आमची भूमिका होती, असं संजय राऊतांनी सांगितले. शरद पवार आपण ज्येष्ठ नेते आहात, आम्ही तुमचा आदर करतो. पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शाहच्या सहकाऱ्यानं तोडली, अशा लोकांना आपण सन्मानित करता, पवारसाहेब आम्हालाही राजकारण कळतं, असं संजय राऊत म्हणाले.
दिल्लीत राजकीय दलालांचे संमेलन
काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. ठाण्याबाबत शरद पवारांकडे चुकीची माहिती आहे. एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात उशिराने आले आणि त्यानंतर ठाण्याची वाट लागली, अशी टीकाही संजय राऊतांनी केली. काल शरद पवारांनी शिंदेंचा नाही, तर अमित शाह यांचा सत्कार केला..हे दुर्दैव आहे, असं टीकास्त्र देखील संजय राऊतांनी सोडलं. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कोणाचाही सन्मान केला जातोय, असंही संजय राऊतांनी सांगितले. दिल्लीमध्ये सुरू असलेलं मराठी साहित्य संमेलन म्हणजे दलाली आहे. दिल्लीत राजकीय दलाल आहेत, असा निशाणा संजय राऊतांनी साधला.
शरद पवार यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचे कौतुक
सातारा जिल्ह्याने महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री दिले. मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री झंझीभाई होते. त्यानंतरच्या काळात यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच नांदवळ गावचे शरद पवार देखील याच यादीत येतात”, असं शरद पवार म्हणाले. ठाणे, नवी मुंबई, मुंबई या नागरी भाग आहे. ठाण्याचे राजकारण योग्य दिशेने नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्यांमध्ये माजी नगराध्यक्ष सावळाराम पाटील, रांगणेकर यांच्याबरोबर एकनाथ शिंदे यांचेही आवर्जून नाव घ्यावे लागेल, असं शरद पवार म्हणाले.
एकनाथ शिंदेंचा आज सन्मान आहे. त्यांनी सांगितलं आम्ही सगळे सातारचे…गंमतीची गोष्ट आहे. ठाणे महानगरपालिकेत एकनाथ शिंदे सन्माननिय सभासद होते. अनेक वर्ष त्यांच्या नेतृत्वात ती संस्था चालू होती. अनेक वर्ष एकनाथ शिंदे नेते होते. नागरी प्रश्नांची जाण असणाऱ्या नेत्यांची माहिती घेतली तर त्यामध्ये एकनाथ शिंदेंचं नाव घ्यावं लागेल, असं म्हणत शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं. साताऱ्याचेच कवी सावळाराम पाटील हे ठाण्याचे नगराध्यक्ष होते. पाटील यांना ठाण्याचे नगराध्यक्ष करण्याचा किस्सा पवार यांनी यावेळी सांगितला. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनीही एकनाथ शिंदे यांच्या राजकीय संघर्षाचे यावेळी कौतुक केले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी देखील शरद पवार यांच्याबाबत बोलताना शाब्दिक फटकेबाजी केली.
एकनाथ शिंदे भाषणात काय म्हणाले?
महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार असून या सन्मानापेक्षा हा पुरस्कार मिळाल्यामुळे येणारी जबाबदारीची जाणीव मला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. शरद पवार यांच्या सारख्या ज्येष्ठ आणि जाणत्या नेत्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणे ही गौरवाची बाब आहे. शरद पवारांची राजकारणातील गुगलीही कळत नाही, मात्र शरद पवारांचे आपल्यासोबत चांगले संबध आहेत, त्यामुळे ते मला भविष्यकाळात कधीही गुगली टाकणार नाहीत, असं मिश्किल विधान एकनाथ शिंदे यांनी केलं. पानिपतानंतर अवघ्या 10 वर्षात महादजी शिंदे यांनी दिल्लीत भगवा फडकवला. महादजी शिंदेंमुळे ब्रिटिशांना भारतात सत्ता काबीज करण्यासाठी तब्बल 50 वर्षे वाट पहावी लागली. त्यामुळेच इंग्रजांनी त्यांना ‘दी ग्रेट मराठा’ ही पदवी दिली होती, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितले. महादजी शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्यात येईल, तसेच कणेरखेड येथे महादजी शिंदे यांच्या राष्ट्रीय स्मारकाबाबत राज्य सरकार नक्की विचार करेल, अशी ग्वाही देखील एकनाथ शिंदेंनी दिली.