राहुल सोलापूरकरची जीभ छाटणारास राष्ट्रवादीच्या आमदाराकडून तर थोबाड फोडणारास ठाकरे गटाच्या नेत्याकडून प्रत्येकी १ लाखाचे बक्षीस

अकोला : छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरची जीभ छाटणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस देणार असल्याची वादग्रस्त घोषणा राष्ट्रवादीचे आमदार म्हणून मिटकरी यांनी केली. जोपर्यंत राहुल सोलापूरकर हा छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांच्या जोड्यांवर नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत त्याला शिवप्रेमी माफ करणार नसल्याचं मिटकरी म्हणालेत. अभिनेते राहुल सोलापूरकरांचा जुन्हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये त्यांनी आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी वक्तव्य केल्यानंतर आता पुन्हा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान राहुल सोलापूरकरचे तोंड फोडा आणि 1 लाख बक्षीस मिळवा, अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी केली आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, बहुजन समाजाची अस्मिता असलेल्या महामानवांच्या विरोधात राहुल सोलापूरकरने वक्तव्य केलं. त्याने चर्चेत राहण्यासाठीच हे वक्तव्य केलं, जाणीवपूर्वक बदनामी केली. राहुल सोलापूरकरने वापरलेले अपशब्द हे देशद्रोहापेक्षा कमी नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जननेते पुढाकार घ्यावा आणि प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा.
राहुल सोलापूरकर जिथे दिसेल त्या ठिकाणी मी त्याचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही असाही इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे. तसेच त्याची जीभ छाटणाऱ्यास एक लाखांचं बक्षीस देण्याची घोषणाही त्यांनी केली.
राहुल सोलापूरकरांचा माफीनामा
दरम्यान, बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी केलेल्या वक्तव्यावर वाद निर्माण झाल्यानंतर अभिनेता राहुल सोलापूरकरांनी पुन्हा एकदा माफी मागितली आहे. आंबेडकरांवर केलेल्या वक्तव्यावर सोलापूरकरांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
आंबेडकर नावाच्या शिक्षकाने बाबासाहेबांना दत्तक घेतलं होतं , म्हणून ते पुढे विद्वान झाले आणि वेदात सांगितल्याप्रमाणं डॉ.बाबासाहेब आंबेडकरही ब्राह्मणच असल्याचं वक्तव्य राहुल सोलापूरकरांनी केलं होतं. त्यामुळे शिवरायांनंतर आता आंबेडकरांच्या संबंधित केलेल्या वक्तव्यानं राहुल सोलापूरकर चांगलेच अडचणीत आले आहेत.
राहुल सोलापूरकर यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, जिथे दिसतील तिथे त्यांना जोड्याने मारायला हवं असं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. राहुल सोलापूरकर यांच्या पुण्यात असणाऱ्या निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राहुल सोलापूरकर यांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातील वक्तव्य केल्याचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर जाहीर केला. यानंतर खबरदारी म्हणून सोलापूरकर यांच्या कोथरूड येथील निवासस्थानाबाहेर पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी लावलेला पोलिस बंदोबस्त आजही कायम असल्याचे पाहायला मिळतोय.
काय म्हणाले होते उदयनराजे भोसले?
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांनी नाक घासून माफी मागावी, अशी मागणी राज्यभरातून होत आहे. याच अनुषंगानं खासदार उदयनराजेंनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. महापुरुषांबद्दल अशी वक्तव्ये करणाऱ्यांना जनतेनं दिसेल तिथं ठेचून काढलं पाहिजे. गोळ्या घातल्या पाहिजेत. आपण ज्या लोकशाहीत वावरतो, त्याचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला आहे. असं असताना त्यांच्याबद्दल अशी गलिच्छ विधानं करतात. ते पाहताना मलाच नाही तर सर्व शिवभक्तांना वेदना झाल्याचं उदयनराजे म्हणाले.
“शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांची जीभ हासडली पाहिजे. दिसेल तिथं ठेचून काढलं पाहिजे. अशा औलादींना गोळ्या घातल्या पाहिजेत”, अशा लोकांमुळे देशाच्या अखंडतेला धोका : खासदार उदयनराजे म्हणाले, “राहुल सोलापूरकरसारख्या लोकांना लाचेच्या पलीकडं काही समजत नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला, असा हा प्रकार आहे. त्यांच्यासारख्या लोकांच्या विकृतीत वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. वेगवेगळ्या जाती धर्मात तेढ निर्माण होईल. त्यामुळं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांच्या जिभा हासडल्या पाहिजेत.
फिल्म इंडस्ट्रिजने त्यांना थारा देऊ नये
“शिवाजी महाराजांचे विचार आपण जपले नाही तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. विकृत विधाने करणाऱ्यांना फिल्म इंडस्ट्रीमधील लोकांनी थारा देऊ नये,” असं आवाहनही खासदार उदयनराजेंनी केलंय. “मला वाटतं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे,” असंही उदयनराजे म्हणाले.
जे कोणी महापुरूषांबद्दल अशी विधानं करतात त्यांच्यावर कडक कारवाई करावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचं खासदार उदयनराजे यांनी सांगितलं. यापूर्वी माजी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावेळीही उदयनराजे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं.