MaharashtraPoliticalUpdate : राष्ट्रवादीतील बदनाम बडी मुन्नी कोण ? आ. सुरेश धस यांच्या वक्तव्याची चर्चा ….

मुंबई : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरुन आक्रमक पवित्रा घेत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून परत आल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर तोफ डागली आहे. आजही आमदार सुरेश धस यांनी थेट धनंजय मुंडेंचं नाव न घेता, आकाचे आका असं म्हटलं. त्यामुळे, सध्या आका आणि आकाचे आका हा शब्दप्रयोग राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान आमदार धस यांनी त्यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या आमदार अमोल मिटकरी यांचा बालिश म्हणून उल्लेख करीत राष्ट्रवादीत बडी मुन्नी आहे, ती अमोल मिटकरीला बोलायला लावते, अशा नव्या शब्दाचा प्रयोग केल्याने ही बडी मुन्नी कोण ? असा प्रश्न चर्चिला जात आहे.
भाजपचे आमदार सुरेश धस हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झाले होते. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण सुरेश धस यांनी लावून धरले आहे. सुरेश धस यांनी अजितदादांची सलग दोन दिवस भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले. सुरेश धस यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांच्यावरही निशाणा साधत वाल्मिक कराडवर आरोप केले. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरही धस यांनी वक्तव्य केले.
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरण आमदार सुरेश धस यांनी लावून धरलं असून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर, याप्रकरणी एसआयटी नेमण्यात येईल असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानुसार, याप्रकरणी एसआयटी नेमण्यात आली असून सीआयडीकडून या खूनप्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे हे प्रकरण गाजत आहे. आमदार सुरेश धस यांनी सरपंच हत्याप्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं. त्यावेळी, वाल्मिक कराडचा उल्लेख आका म्हणून ते करत. तर, वाल्मिक कराडचा वरदहस्त असलेले किंवा त्यांचे निकटवर्तीय असलेल्या धनंजय मुंडेंचा थेट उल्लेख करण्याऐवजी ते आकाचा आका.. असा उल्लेख करत. एका मुलाखतीमध्ये आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे असल्याचंही सुरेश धस यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे, आका म्हणजे वाल्मिक कराड तर आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. आता, सुरेश धस यांनी बडी मुन्नी असा उल्लेख करत आणखी एका नेत्याकडे रोख दर्शवला आहे.
राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण?
आमदार अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, सुरेश धस हेही आका असल्याचं मिटकरींनी म्हटलं. त्यावर प्रतिक्रिया देताना सुरेश धस यांनी बदनाम झालेली बडी मुन्नी हा शब्दप्रयोग केला. अमोल मिटकरी स्वत: बोलत नाही, त्याला बडी मुन्नी बोलायला लावत आहे. पण, मी बडी मुन्नीची सुन्नी करतो, असेही धस यांनी म्हटले. त्यामुळे, सुरेश धस यांनी बडी मुन्नी उल्लेख करत राष्ट्रवादीतील कोणत्या नेत्याकडे रोख धरला, लक्ष वेधले याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारण, अमोल मिटकरींना नेमकं कोणी बोलायला लावलं, मिटकरींना आरोप करायला कोणी लावलं याची चर्चा सुरू झाली. तसेच, राष्ट्रवादीतील बडी मुन्नी म्हणत कोणत्या बड्या नेत्याकडे धस यांनी आपला मोर्चा वळवलाय, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
अजित पवारांच्या भेटीनंतर सुरेश धस काय म्हणाले?
अजित पवारांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांनी म्हटले की, वाल्मिक कराड हे गंभीर प्रकरण आहे. मोठ्या प्रमाणात गँग तयार करण्याचं काम वाल्मिक कराडने केले आहे. या गँगला मोक्का लावण्यात यावा अशी मागणीदेखील सुरेश धस यांनी केली. भविष्यात जे तिहार जेलमध्ये होतंय; सलमान बाबत जे मुंबईत होतंय ते पुढे महाराष्ट्रभरात होईल अशी भीती देखील सुरेश धस यांनी व्यक्त केली. बीडमधील काही पतसंस्था बुडाल्या, यात वाल्मिक कराडचा संबंध आहे. यात खाडे नावाचा पोलीस अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचे आढळून आला. त्यावेळी त्याच्या घरी कॅश सापडली. वाल्मिक कराडनं डिफेंडर गाडी घेतली. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंनी पैसे बुडवणाऱ्यांना पाठीशी घातलं हे उघड आहे असल्याचा आरोप धस यांनी केला.
बीडमध्ये नैतिकता नाही. मात्र, मी राजीनामा मागितलेला नाही….
दरम्यान सुरेश धस यांनी त्यांच्याच पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यावरही टीका केली. पंकजाताईंनी 745 शिक्षकांची भरती सर्व नियम धाब्यावर बसवून केली असल्याचे धस यांनी म्हटले. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत बोलताना सुरेश धस म्हणाले की, मी कधीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. त्यांचा राजीनामा घेण्याची जबाबदारी मागे असलेल्या देवगिरी बंगल्यातील लोकांकडे आहे. बीडमध्ये नैतिकता नाही. मात्र, मी राजीनामा मागितलेला नाही असेही धस यांनी सांगितले.