Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

संतोष देशमुख हत्या प्रकरण : अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट : जनतेला मुर्खात काढत आहात का? छत्रपती संभाजीराजे भडकले

Spread the love

मुंबई  : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत असताना  धनंजय मुंडे यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे धनंजय मुंडे राजीनामा देणार का? याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र, आज धनंजय मुंडे यांनी मी राजीनामा दिलेला नाही, अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. यावरून छत्रपती संभाजीराजे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

माध्यमांशी  बोलताना  छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे जावं लागणं हे दुर्दैव आहे. जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार आहे. धनंजय मुंडे यांच्यामध्ये इतकं काय आहे की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काहीच भूमिका घेत नाहीत. धनंजय मुंडे ओबीसी समाजाचे आहेत म्हणून सरकार ठोस भूमिका घेत नाही का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.

जनतेला मुर्खात काढत आहात का?

ते पुढे म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हत्येला जातीय रंग देऊ नये. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट केवळ नवीन वर्षाचे शुभेच्छा देण्यासाठी होती का? महाराष्ट्राच्या जनतेला मुर्खात काढत आहात का? संतोष देशमुख यांना मारत असल्याचे अनेक व्हिडिओ पोलिसांना मिळाले आहेत. पोलीस ते व्हिडिओ जनतेसमोर का आणत नाहीत? संतोष देशमुख यांच्या हत्येची तपासणी करण्यासाठी एसआयटी नेमली, त्यामध्ये वाल्मीक कराड सोबत संबंध असलेले अधिकारी आहेत. बीडमधील लहान मुलांपासून सर्वांना माहिती आहे की, या प्रकरणातील आरोपी कोण आहेत. मग सरकार याकडे दुर्लक्ष का करत आहे? महाराष्ट्रामध्ये दहशत पसरवण्याचे काम या घटनेमुळे होत आहे. या प्रकरणातील मारेकऱ्यांना शिक्षा देऊन दहशत मोडीत काढण्याचे पहिलं पाऊल उचलावं. या प्रकरणी अनेकांना धमकी आली आहे. मात्र, मला धमकी देण्याचे धाडस कोण करत नाही. जर कोणी धमकी देण्याचे धाडस केलं तर पुढे बघू, असेही त्यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!