Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराडची शरणागती , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संतापलेले विरोधक..

Spread the love

पुणे :  तब्बल 22 दिवसानंतर बीड जिल्ह्यातील मस्साजोगगावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याने अखेर सीआयडी पुणे कार्यालयात आत्मसमर्पण केलं. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आणि दोन कोटींच्या खंडणीप्रकरणी वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी होत होती. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड गेल्या 22 दिवसांपासून फरार होता. पोलीस आणि सीआयडी त्याच्या मागावर होती. आज त्याने आत्मसमर्पण केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. तर दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने  संताप व्यक्त करत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले  आहे. विरोधी पक्षाबरोबत महायुतीच्या आमदारांनीही या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे. 

दरम्यान वाल्मिक कराडने स्वतः जाऊन आत्मसमर्पण केले आहे. माहिती नाही त्यांच्या मागे कोणाचा हात आहे. त्याचीही माहिती नाही, या प्रकरणातील आणखी तीन आरोपी फरार आहेत म्हणतात, त्यांना कधी पकडणार असा सवाल करत आम्हाला न्याय कधी मिळणार असं संतोष देशमुख यांच्या बहिनीने म्हटलं आहे.

संतोष देशमुख यांच्या  बहिणीची संतप्त प्रतिक्रिया….

एका चांगल्या माणसाला न्याय मिळत नाही, ही आज परिस्थिती आहे. लवकरात लवकर या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घ्या आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. भावाच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळाल्याने आम्हाला आणि माझ्या भावाला न्याय मिळाल्याचे  समाधान तरी मिळेल. लवकरात लवकर त्या तीन आरोपींना देखील अटक केली पाहिजे. न्याय मिळाल्याशिवाय आमचं समाधान होणार नाही. यंत्रणांवरती आमचा विश्वास नाही अशी परिस्थिती आहे, इतकी मोठी यंत्रणा जर तपास करत असेल, तर मग आतापर्यंत का शोध लागत नाही, असा सवाल संतोष देशमुख यांची बहीण प्रियंका चौधरी यांनी उपस्थित केला आहे.

बीड येथील मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला निर्घृण हत्या  करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे  यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड  यांच्यावर आरोप केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड फरार होता. मात्र आज 22 दिवसांनंतर वाल्मिक कराड हा पुण्यातील सीआयडीच्या  कार्यालयात शरण आला. आता यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बीडच्या प्रकरणामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही : मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की, बीडच्या प्रकरणामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही. ज्याचा ज्याचा संबंध आढळेल त्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल. अतिशय कडक कारवाई करण्यात येईल. गुंडांचे राज्य आम्ही चालू देणार नाही. कोणालाही अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही. खंडणी मागता येणार नाही. यादृष्टीने अतिशय गतिशील तपास केलेला आहे. त्यामुळेच आज वाल्मिक कराडला शरणागती पत्करावी लागली आहे. आता हत्येतले जे आरोपी फरार आहेत, त्यांना पकडण्याकरता वेगवेगळ्या टीम्स कामी लागलेल्या आहेत. कुठलाही आरोपी आम्ही सोडणार नाही, सगळ्यांना शोधून काढू, असे त्यांनी म्हटले.

फडणवीस  पुढे म्हणाले की, आज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंशी माजी फोनवर चर्चा झाली आहे. त्यांनाही मी आश्वासन दिले आहे की, तुम्ही काळजी करू नका. काहीही झाले तरी सगळे दोषी शोधून जोपर्यंत ते फासावर लटकवत नाही, तोपर्यंत पोलीस कारवाई करतील, असेही त्यांनी म्हटले.

जाणीवपूर्वक ही केस सीआयडीकडे….

दरम्यान  वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा दाखल होणार का? असे विचारले असता ते म्हणाले की, कोणता गुन्हा दाखल होईल? कसा होईल? याबाबत सगळी माहिती पोलीस देतील. ते पोलिसांचे काम आहे. पुराव्यांच्या आधारावर कोणालाही सोडणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगत आहे. या संदर्भात वेळोवेळी पोलीस निर्णय करतील. जाणीवपूर्वक ही केस सीआयडीकडे सोपवण्यात आली आहे. त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेली आहे. त्यांच्यावर कोणाचाही दबाव चालवून घेतला जाणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

विरोधकांची सरकारवर टीका ….

महाराष्ट्र पोलिसांचा मोठा दबदबा व नावलौकिक आहे, मुंबई पोलिसांची तुलना तर स्कॉटलंड यार्डशी केली जायची. अशा सक्षम पोलीस दलाची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी २० दिवस पोलीस व सीआयडीला सापडला नाही. तो शरण आला हे पोलीस दलाचे अपयशच आहे. बीडमधील संघटीत गुन्हेगारीचा गंभीर प्रकार पाहता या प्रकरणाचा तपास विद्यमान न्यायमूर्ती यांच्या देखरेखीखाली झाला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, राज्यातील पोलीस दल व सीआयडी आजही सक्षम आहेत पण ते राजकीय दबावाखाली असल्याने त्यांचे मनोबल कमजोर होते. आरोपी शरण येतो पण त्याला पकडू शकत नाही ही लाजीरवाणी व दुर्दैवी बाब आहे. बीड प्रकरणाने सक्षम नेतृत्व म्हणून गवगवा केला जात असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्यादाही राजकारणापुढे स्पष्ट झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांना पदावर राहण्याचा काय अधिकार आहे? नागपूरमध्ये ७ दिवसात ७ खून झाले आहेत, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा व मीडियातून स्वतःचे कौतक थांबवावे असेही अतुल लोंढे म्हणाले.

बीड प्रकरणात सत्ताधारी पक्षाचे आमदारच सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करत आहेत. बीड मधील गुन्हेगारीला सत्ताधारी पक्षाचे आमदार ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ म्हणतात. बीडमधील गुन्हेगारीला आळा घालून राजकीय आशिर्वादाने फोफावलेली ही विषवल्ली कायमची नष्ट करा व यामागे ज्यांचा हात आहे त्यांनाही अद्दल घडवावी असे अतुल लोंढे म्हणाले.

भाजप आमदार सुरेश धस यांची यांची तीव्र प्रतिक्रिया ….

बीड जिल्ह्यातील मस्सोजग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सीयाडीकडे सोपविल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. आता खंडणी प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड हे पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आले आहेत. यानंतर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार व्यक्त केले. “राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्परता दाखविल्यामुळे शेवटी वाल्मिक कराड यांना सीआयडीसमोर शरण यावे लागले. त्याबद्दल मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. यापुढे आता ‘आका’ची संपत्ती जप्त झाली पाहीजे, त्याशिवाय या प्रकरणातील सत्य बाहेर येणार नाही. जर हा निर्णय घेतला नाही, तर आम्हाला वेगळा मार्ग अवलंबवा लागेल”, असे सुरेश धस म्हणाले.

माध्यमांशी बोलत असताना सुरेश धस म्हणाले, “सुदर्शन घुले, प्रतीक घुले या दोन आरोपींनी संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण केली होती. त्यामुळे त्यांनाही लवकरात लवकर अटक करावी. तसेच या दोघांनी व्हिडीओ कॉल करून अटकेतील आरोपी विष्णू चाटे यांना मारहाण कशी होत आहे, हे दाखविले होते. तसेच आता शरण आलेल्या आकालाही व्हिडीओ कॉल केला असल्याचे समोर आले तर त्यांच्यावरही हत्येशी संबंधित गुन्हा दाखल करण्यात यावा.”

गुन्हेगार कधीच गुन्हा मान्य करत नाही….

वाल्मिक कराड यांनी स्वतःवरील आरोप एका व्हिडीओद्वारे फेटाळून लावले आहेत. यावर बोलत असताना सुरेश धस म्हणाले की, अफझल गुरू, अजमल कसाब यांनीही स्वतःचा गुन्हा मान्य केला नव्हता. कोणताही गुन्हेगार स्वतःचा गुन्हा कबूल करत नाही. पण पोलिसांनी कोठडीत घेतल्यानंतर त्यांना गुन्हा सिद्ध करावा लागतो. त्याप्रमाणे पोलिस तपासात सत्य बाहेर येईल, अशी आमची अपेक्षा आहे.

छत्रपती सांभाजीराजे यांनी व्यक्त केला संताप ….

दरम्यान  वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर विरोधक आक्रमक झाले असून वाल्मिक कराडला शरण यायला कोणी सांगितले, कुणाच्या सांगण्यावरुन तो शरण आला असा सवाल उपस्थित होत आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी देखील मंत्री धनजंय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर शंका उपस्थित करताना आपला संताप व्यक्त केला आहे.

संभाजीराजे  म्हणाले की , संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी बीड मध्ये मोर्चा झाला. सीआयडी पोलिसांचे हे यश नाही, थोडं फार सरकारवर जे आम्ही दबाव टाकला होता, त्यातूनच वाल्मिक कराडवर हा मानसिक दबाव आला असेल. आरोपी वाल्मिक कराड 22 दिवस बिनधास्तपणे महाराष्ट्रात फिरतो, अक्कलकोट येथे जाऊन दर्शन घेतो, पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल होतो. काल धनंजय मुंडे फडणवीस यांना भेटतात आणि आज वाल्मीक कराड हजर होतो हा संशोधनाचा भाग आहे, असे म्हणत धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुनच वाल्मिक कराड शरण आल्याचे संभजीराजेंनी म्हटलं आहे. वाल्मिकला धनंजय मुंडेंचा आश्रय आहे. खंडणीच्य गुन्ह्यातून त्याला जामीन मिळेल, पण खूनाच्या गुन्ह्याचं काय, हा असला खेळ खंडोबा नको असे म्हणत वाल्मिक कराडला खुनातील आरोपी करण्याची मागणी देखील संभाजीराजेंनी केली आहे.

वाल्मीक कराड 7 आरोपींचा म्होरक्या आहे, त्याच्या नावाने 14 गुन्हे आहेत आणि तरी सुद्धा बॉडी गार्ड घेऊन फिरतो. वाल्मिक कराडला केवळ खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर अद्यापही खूनाचा गुन्हा दाखल नाही. मात्र, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, वाल्मीक कराडवर मोक्का देखील लागणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री यांनी आता वाल्मीक कराड याच्यावर मोक्का लावणार का याबद्दल स्पष्टीकरण द्यावं, असेही संभाजीराजेंनी म्हटले. माझी मुख्यमंत्री यांना विनंती आहे की, धनंजय मुंडे यांना तर पालकमंत्री पद मुळीच देऊ नका, याशिवाय त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणीही संभाजीराजेंनी केली आहे.

अजित पवारांनाही केले सवाल….

संभाजीराजेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भूमिकेवरही शंका व्यक्त केली आहे. अजित पवारांना सुद्धा विचारायचे आहे की याविषयी तुम्ही एकदाही का बोलला नाहीत. केवळ सांत्वनपर भेट घेऊन उपयोग नाही, तुम्ही देखील याप्रकरणावर बोललं पाहिजे, धनंजय मुंडेंना पाठीशी घालण्याचं काम कोणीही करु नये, असे संभाजीराजेंनी म्हटले. वाल्मीक कराडला मोक्का लावल्याशिवाय आम्ही सुद्धा गप्प राहणार नाही. काल चर्चा आणि आज सरेंडर झाला. धनंजय मुंडे यांच्याकडून वाल्मीक कराडला काही निरोप आला का?, असा सवालही संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे. दरम्यान,वाल्मिक कराड शरण आला तरी त्याला नेमकं कोणत्या गुन्ह्यात अटक करण्यात आली हे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केले नाही. त्यामुळे, अटकेनंतर वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात जामीन देखील मिळू शकतो, असे अनेकांचे म्हणणे आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!