Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराडला घेऊन सीआयडी पथक केजकडे रवाना….

पुणे: अखेर तब्बल २२ दिवसानंतर बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आलेला वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीसमोर शरण आला आहे. हत्या प्रकरणात संबंध असल्याचा ठपका ठेवण्यात आलेले वाल्मिक कराड तीन आठवड्यांपासून फरार होता. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यामध्ये वाल्मिक कराड याचेही नाव होते. वाल्मिक कराड याचा शोध सीआयडीकडून घेतला जात होता.
दरम्यान, सीआयडीसमोर सरेंडर होण्यापूर्वी वाल्मिक कराड यांनी स्वत: आपली प्रतिक्रिया देताना आपला या गुन्ह्याशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. वाल्मिक कराड पुण्यात सरेंडर करणार अशा २ दिवसांपासून चर्चा होत्या. आज सकाळी ७ वाजता प्रारंभी अचानक पुण्यातील सी आय डी ऑफिस बाहेर आज वाल्मिक कराड याचे कार्यकर्ते एकत्रित आले तेंव्हा पोलीस अलर्ट झाले. ही बातमी समजताच सकाळी ९ वाजता सी आय डी ऑफिस बाहेर माध्यम प्रतिनिधी हजर झाले तेंव्हा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर सकाळी १० वाजता पुणे पोलीस दलातील उपायुक्त संदीप गिल आणि गुन्हे शाखेचे उपयुक्त निखिल पिंगळे सी आय डी ऑफिस बाहेर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले. तेंव्हा सकाळी ११ वाजता: १२ ते १ दरम्यान वाल्मिक कराड सी आय डी कार्यालयात दाखल होणार अशी माहिती समोर आली आणि दुपारी १२ वाजता पुणे सी आय डी कडे सरेंडर करणार असल्याचे स्वतः वाल्मिक कराड याने व्हिडिओ केला शेयर केला आणि दुपारी १२. १५ वाजता: MH23 BG 2231 स्कॉर्पिओ या वाहनातून चेहरा लपवत वाल्मीक कराड सी आय डी ऑफिस मध्ये दाखल झाला आणि स्वतःला सीआयडीच्या स्वाधीन केले. त्यानंतर दुपारी १ वाजता सी आय डी चे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांच्याकडून वाल्मीक कराड ची चौकशी सुरु झाली आहे.
ती स्कॉर्पिओ कोणाची?
दरम्यान,वाल्मिक कराड ज्या गाडीतून सीआयडी कार्यालयात आला, त्या गाडीचा क्रमांक हा MH.23.BG.2231 असा आहे. ही गाडी अनिता शिवलिंग मोराळे नामक व्यक्तीच्या नावे असून तो शिवलिंग मोराळे ही व्यक्ती बीड जिल्ह्यातील पालीचा रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर, शिवलिंग मोराळे हा मंत्री धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असल्याचे दिसून येते. मात्र, याबाबतही अधिकृत माहिती लवकरच समोर येईल.
कराडची तब्येत बिघडल्याची माहिती….
बीड जिल्ह्यातील पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मागील २२ दिवसांपासून कराड हा फरार होता. वाल्मिक कराडसह सरपंच हत्या प्रकरणातील इतर फरार तीन आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी बीडमध्ये नुकताच सर्वपक्षीय मोर्चाही काढण्यात आला होता. या मोर्चानंतर सरकारवर निर्माण झालेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर सीआयकडून वेगवान तपास सुरू होता. अशातच आज कराड स्वत:हून सीआयडी कार्यालयात हजर झाला. मात्र सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून जबाब लिहून घेतला जात असतानाच काही वेळानंतर कराडची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली.
सीआयडीकडे आत्मसमर्पण केल्यानंतर चौकशीदरम्यान वाल्मिक कराडची तब्येत बिघडली. त्यानंतर त्याला नातेवाईकांना औषधे आणून दिल्याचे समजते. त्याला रक्तदाबासंदर्भातील त्रास झाल्याचं बोललं जात आहे. सीआयडी पोलिस त्याला केज पोलिसांसमोर हजार करण्यासाठी निघाले आहेत.
दरम्यान, अनेक गुन्ह्यांतील आरोपी चौकशी टाळण्यासाठी किंवा चौकशीनंतर पोलीस कोठडी टाळण्यासाठी आजारपणाचं सोंग घेत असतात. वाल्मिक कराड प्रकरणातही ते होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण वाल्मिक कराड हजर होण्याच्या दोन दिवसांपासूनच त्याच्या जवळच्या लोकांकडून बीडमध्ये जिल्हा रुग्णालयात पाहणी करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. म्हणजे वाल्मिक हा हजर झाल्यानंतर त्याला उपचाराच्या निमित्ताने रुग्णालयात हलवण्याची तयारी तो हजर होण्याच्या दोन दिवस आधीपासूनच सुरू होती की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
शरण जाण्याच्या आधी वाल्मिक कराडने जारी केला व्हिडिओ ….
दरम्यान, सीआयडीला शरण जाण्यापूर्वी कराडने एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये त्याने केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाल्याचा आरोप केला आहे. मी सीआयडी ऑफिस पुणे येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी, फाशी द्यावी. राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्या प्रकरणाशी जोडले जात आहे. पोलीस तपासात जर मी दोषी दिसलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला तयार आहे, असे कराड याने म्हटलं आहे.
अवदा कंपनीतील कर्मचाऱ्यास दोन कोटी रुपयांची खंडणी मागणारे वाल्मिक कराड यास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून त्याला अटक करुन मंगळवारी सायंकाळपर्यंत केज येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे. पुणे येथून आरोपी कराड यास ताब्यात घेऊन तपासाची पुढील प्रक्रिया केली जाईल असे पोलिसातील वरिष्ठ सूत्राने सांगितले. केज येथे खंडणी प्रकरणातील आरोपानंतर कराडे याचे नाव संतोष देशमुख प्रकरणातील हत्येचा सूत्रधार म्हणून चर्चेत आले होते. दरम्यान शरण येताना हत्येच्या प्रकरणाशी काही संबंध नाही. मारेकऱ्यास शिक्षा व्हावी अशी भूमिका असल्याचे कराड याने समाजमाध्यमांमध्ये जाहीर केले आहे.
वाल्मिक कराड अनेक गुन्ह्यातइल आरोपी….
कराड याच्यावर या पूर्वी १० गुन्हे दाखल असून त्यात खंडणी मागणी, अवैध जमाव जमविणे, दंगल घडवून आणणे आदीचा समावेश आहे. राज्य गुन्हे अन्वषण विभागाने त्याच्या गुन्ह्याची यादी तयार केली असून ती न्यायालयात सादर केली जाणार आहे. त्या आधारे त्यास पोलीस कोठडी मागण्यात येईल. दरम्यान पुण्याहून कराड यास आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. बीडचे पाेलीस अधीक्षक नवनीत कॉवत, सीआयडीचे प्रमुख अधिकारी तसेच स्थानिक पोलीस कर्मचारी या कामासाठी तैनात करण्यात आले आहेत. बीड शहरातून कराड यास आणले जाणार असल्याने जमाव एकत्र होऊ नये, याची काळजीही पोलीस घेत आहेत. दरम्यान अटक करण्यात आलेल्या अन्य आरोपीची व कराड यांची एकत्र व वेगवेगळी चौकशी होईल असे सांगण्यात येत आहे.