बीड : संतोष देशमुख खून प्रकरणात न्यायालयीन चौकशीचे आदेश , गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही : मुख्यमंत्री

नागपूर : बीडमधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मोठ्या कारवाईचे संकेत दिले आहेत. या गुन्ह्याचा सर्व संबंध तपासला जात आहे. या गुन्ह्यात कुणीही दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही. वाल्मिक कराड याचा संबंध कुणासोबत आहे, याचा विचार न करता कारवाई केली जाईल. त्याचे फोटो सर्वांसोबत आहेत. आमच्यासोबत व पवार साहेबांसोबतही आहेत. पोलीस प्रशासनाची ही जबाबदारी आहे, स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही यावेळी देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हत्या प्रकरणी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस एसपींची तात्काळ बदली करणार असल्याची घोषणा सभागृहात केली.
सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे. याचा दोष पोलीस प्रशासनाचा देखील आहे. पोलिसांनी देखील आपण एखाद्यावर एखादी फिर्याद नोंदवतोय तर त्याची वस्तुस्थिती काय आहे ते तपासले पाहिजे. मध्यंतरीच्या काळामध्ये हे अशा प्रकारचे काम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. यापुढे हे सहन केले जाणार नाही. मी या सभागृहांमध्ये तुम्हाला अश्वस्त करतो या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या जे कोणी असतील त्यांची पाळेमुळे आम्ही खणून काढू आणि ज्या सर्वांवर गुन्हे आहेत, त्यावर 302 तर लागेलच पण त्यांच्यासोबत काम करायला जेवढे लोक आहेत. वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये हे सर्व एकत्रितपणे मकोका गुन्ह्यासाठी पात्र होतात, त्यांच्यावर मकोका लावण्यात येईल, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
न्यायालयीन चौकशी तीन ते चार महिन्यात …..
जे लोक या गुन्हेमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सामिल असतील असे निष्पन्न झाले तर त्यांना ही संघटित गुन्हेगारीचा भाग समजून त्यांनाही मकोकामध्ये टाकण्यात येईल आणि बीड जिल्ह्यामध्ये वाळूमाफिया वेगवेगळ्या अशा प्रकारचे जे लोक आहेत. एक मोहीम हातामध्ये घेऊन त्या सर्व लोकांवर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. संतोष देशमुख प्रकरण आहे त्या प्रकरणांमध्ये दोन प्रकारची चौकशी आम्ही करणार आहोत. एक आयजी लेवल अधिकारी यांच्या अंतर्गत एक एसआयटी तयार करण्यात आली आहे. आणि दुसरीकडे एसआयटी चौकशी करताना गुन्ह्याच्या अनुषंगाने करते, इको सिस्टीमच्या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे म्हणून न्यायालयीन चौकशी देखील त्या संपूर्ण प्रकरणाची केली जाईल. आपण साधारण तीन ते चार महिन्यात सहा महिन्यात हे सर्व पूर्ण करू, अशी टाईमलाईन देखील देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
संतोष देशमुख यांच्यासारख्या युवा सरपंचाची हत्या झाली त्याचे मोल आपण पैशात करू शकत नाही. पण, एक छोटीशी मदत म्हणून त्यांच्या परिवाराला राज्य सरकारच्यावतीने दहा लाख रुपयांची मदत करण्यात येईल, त्या संपूर्ण प्रकरणाची गंभीर आणि त्यासोबत जे प्रकरण बाहेर येत आहेत, त्या सर्व प्रकरणांमध्ये कुठेतरी पोलीस प्रशासनाची कुचराई दिसत असल्यामुळे बीडच्या एसपींना ट्रान्सफर करण्याचा निर्णय या ठिकाणी मी घेतलेला आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी पुढे म्हटलं आहे. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यातील फौजदार पाटील यांचे निलंबन करण्यात आले असून, पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनाही सक्तीच्या रजेवर पाठविले आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय घडलं?
अशोक घुले, नारायण घुले, प्रतिक घुले असे आरोपी दुपारी तिकडे गेले. तेथील वॉचमनला मारहाण केली. पीडितांनी सरपंचांना फोन केला.आरोपी बाजूच्या गावचे होते. देशमुख आणि अन्य काहीजण तिथे पोहचले. त्यांना चोप दिला. याचा व्हिडीओ व्हायरल झाला. 9 डिसेंबरला संतोष अण्णा चारचाकी वाहनातून गावी परत जात होते. ते एकटेच होते. पेट्रोल पंपावर आत्तेभाऊ भेटले. त्यांना सोबत घेऊन निघाले. टोल नाक्याजवळ काळ्या रंगाची स्कॉर्पिओ व एक गाडी वाट पाहत होती. टोल नाक्यावर जाताच त्यांनी गाडी अडवली. काच फोडून त्यांना बाहेर काढले आणि स्कॉर्पिओ गाडीत टाकून मारहाण केली. काही दिवसांनी त्यांची हत्या झाल्याचे समोर आले, अशी माहिती देखील देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितली.