Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोठी बातमी : संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड प्रकरण : परभणीतील आंदोलकाचा पोलीस कोठडीत मृत्यू; महाराष्ट्र बंदची हाक

Spread the love

प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला संताप….

परभणी : परभणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड करण्यात आल्यानंतर हिंसाचार उसळला होता. यानंतर पोलिसांनी कडक कारवाई करत लाठीचार्ज केला, तसेच अनेक आंदोलकांना अटक केली. अटकेत असलेला आंदोलक सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्यानंतर आता आनंदराज आंबेडकर यांनी १६ डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मयत सोमनाथ सूर्यवंशी हा श्री शिवाजी विधी महाविद्यालयातील कायद्याचा विद्यार्थी होता. 

परभणी येथील स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्याचा प्रकार समोर आला होता. याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. शहरातील काही दुकाने आणि वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. संतप्त जमावाने एसटी बसवरही दगडफेक केली होती. दरम्यान आता या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी याबद्दल सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे.

अत्यंत वेदनादायक, भयानक आणि असह्य करणारे….

मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव सोमनाथ सुर्यवंशी असून प्रकाश आंबेडकरांनी त्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत की, “परभणीत वडार समाजातील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू झाला आहे, हे अत्यंत वेदनादायक, भयानक आणि असह्य करणारे आहे. त्यांचा जामीन अर्ज मंजूर होऊनही न्यायालयीन कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला, याहून असहनीय काय असेल!”

https://x.com/Prksh_Ambedkar/status/1868196941026250926?

पुढे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की, “त्यांचा (सोमनाथ सुर्यवंशी) मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला असल्याने, आमचे वकील न्यायालयाला विनंती करतील की पोस्टमॉर्टम (सीटी स्कॅन, एमआरआय, फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजिकल) फॉरेन्सिक विभाग असलेल्या सरकारी रुग्णालयामध्ये केले जावे आणि फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजी या दोन्ही विभागांकडून पोस्टमॉर्टमचे चित्रीकरण केले जावे”. याबरोबरच प्रकाश आंबेडकर यांनी “आम्ही न्यायासाठी लढू!”, असेही म्हटले आहे.

वंचित बहुजन आघाडीने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर काल एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमधून परभणी पोलीसांनी दलित महिलेला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महिलेला परभणी पोलिसांची बेदम मारहाण

“व्हिडीओमध्ये रुग्णालयात दाखल दलित महिलेला परभणी पोलिसांनी बेदम मारहाण केली. पोलीसांनी तिच्या मांड्या आणि पोटावर उभे राहून तिच्या डोक्यावर व हातावर लाठ्या मारल्या. तिला शौचालय वापरायचे आहे असे तिने म्हटल्यावर पोलीसांनी तिचे पाय पसरले आणि तिच्या पायांवर मारले.तिचा एक हात फ्रॅक्चर झाला असून, तिच्या डोक्याला झालेल्या जखमांसाठी तिला सीटी स्कॅन करावे लागेल”, असे सांगण्यात आले.

https://x.com/VBAforIndia/status/1867821768649416767?

“हे एकमेव प्रकरण नाही! परभणीत आंबेडकरी वस्त्या लक्षित पोलिस अत्याचाराची अशी शेकडो प्रकरणे समोर आली आहेत! शेकडो!! हे लिहितांना आपले डोळे राग आणि अश्रूंनी भरून आले आहेत”, असेही पोस्टमध्ये वंचित आघाडीने म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!